स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – संदिप गाडवे
महाबळेश्वर.दि.०४ कविता ही कादंबरी ,नाटक यापेक्षाही वेगळी असते.यामध्ये अर्थगर्भ आणि कल्पक शब्द फुलांची वेल असते.ओंजळीतल्या चंद्रातून असाच शब्दरूपी फुलांचा सुगंध उद्याचे विश्व व्यापेल.त्याच्या चैतन्याचा गंध सर्वदूर पसरत यातूनच माणसं प्रफुल्लित होऊन जातील. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत साहित्यिक प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.जावळीच्या प्रतीभावंत लेखिका,कवयित्री प्राथमिक शिक्षिका अंजली गोडसे यांच्या ओंजळीतला चंद्र या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री आश्विनी महांगडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव-भुजबळ,सुप्रसिद्ध वक्ते,लेखक प्रदीप कांबळे, दीपक भुजबळ,गणेश तोडकर, शंकर जांभळे,सुरेश चिकणे,विजय शिर्के,तानाजी आगुंडे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी,दीपक मगर ,शिक्षक -शिक्षिका,मर्ढे ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले, साहित्याचे श्रेष्ठत्व हे तुम्हांला काय द्यायचं, कुठला विचार देतं यावर अवलंबून असते.यासाठी सहजपणे विचार जन्माला येत नाहीत म्हणून स्वतःच्याच कवितेने स्वतःचाच चेहरा समाजासमोर आणण्यासाठी स्वत्व शोधावे लागते ही मोठी तपश्चर्या असते.शब्दांची पालखी घेत साहित्य तुमच्या दारापर्यंत येते म्हणजे एक प्रकारच्या विचाराने समाज जीवन प्रवाही होते. कविता तुमच्या अवतीभवती असते. गर्भ जपावा लागतो ना तसेच शब्द जपावे लागतात.अस्वस्थ मनाचा तो हुंकार असतो यातून आशा अलौकिक कलाकृतीं जन्माला येतात.हेच या काव्यसंग्रहातून प्रतीत होत असून तुम्हांला यातून एक वेगळा आनंद मिळेल.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आश्विनी महांगडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव-भुजबळ,सुप्रसिद्ध वक्ते,लेखक प्रदीप कांबळे ,किरण भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनीषा शिरटावले यांनी प्रास्ताविक केले.योगिता मापारी,नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.शशीकांत गोडसे यांनी आभार मानले.



