
स्टार ११ महाराष्ट्र
प्राथमिक उपचार मिळाला नसल्याने चिमुरडीचा मृत्यू
प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
केळघर. केळघर येथील चार वर्षाच्या सर्पदंश झाल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या मुलीवर वेळेत प्राथमिक उपचार न झाल्याने वैद्यकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप करून नातेवाईक व ग्रामस्थानी आज प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर येथे काही वेळ ठिय्या आंदोलन करून या प्रकरणी जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन तालुका आरोग्य आधिकारी जावळी यांना आज दिले.

दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी ,येथील चार वर्षांची मुलगी श्रीशा मिलिंद घाडगे हिला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात आई जेवण भरवत असताना सर्पदंश झाला होता. त्यावेळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते.मात्र येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून योग्य व वेळेत प्राथमिक उपचार न झाल्याने रुग्णाची अवस्था गंभीर झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दवाखान्यात दोन रुग्णवाहिका असून देखील उपलब्ध न झाल्याने खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले परंतु उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे श्रीशाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या आंदोलनात उपसरपंच शंकर बेलोशे, सागर पार्टे, बाजीराव धनावडे, जगन्नाथ पार्टे, यशवंत बेलोशे, सतीश पार्टे, सुनील बेलोशे, बाजीराव पार्टे, दत्ता बेलोशे ,प्रीतम पार्टे,संदीप बेलोशे, अक्षय बेलोशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार – –
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची २४ तास सेवा असूनही रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला उपचाराची मेढा किंवा सातारा येथे जावे लागते.आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत.आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने उपकेंद्रे ही वारंवार बंद अवस्थेत पाहायला मिळतात.
१०८ रुग्णवाहिका सेवा ऑफलाईन —
गेल्या काही महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिका वर सेवा देण्यासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने गंभीर आजारी रुग्ण असो किंवा रस्त्यावरील झालेल्या अपघातातील रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर रुग्णवाहिका उभी असूनही वेळेत मिळत नसल्याने रुग्णांना अनेक वेळा खाजगी गाडीतून पुढील उपचारासाठी न्यावे लागते.
आरोग्य केंद्राच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले.सदर घटनेची सविस्तर चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेस सादर करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप यादव यांनी सांगितले.



