सामाजिक

दिवदेव गणेशोत्सव मंडळाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

स्टार ११ महाराष्ट्र


मेढा,दि २१.   “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…” या भावनिक सादेसह दिवदेव येथील गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उदात्त हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


महिलांसाठीही त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा, आनंद आणि मनोरंजन मिळावे, या कल्पक हेतूने ‘खेळ पैठणीचा’ तसेच लकी ड्रॉ कूपन यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यंदा मंडळाच्या वतीने महिलांसाठी विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे महिलांनी कौतुक केले.
गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील सर्व विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसह यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.


गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवप्रेरणा युवा मित्र मंडळाचे सहकार्य तसेच ग्रामस्थ मंडळ देवदेव यांचे पाठबळ लाभले. भविष्यातही हे सहकार्य व पाठबळ असेच कायम राहावे, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.
अखेर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देत उत्सवाची आनंदमय सांगता करण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!