स्टार११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा.दि.२०. जावली तालुक्यात खऱ्या अर्थाने आज दमदार पाऊसास सुरुवात होवून नाले, ओढे वाहु लागले असताना मेढा नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल कडे दुर्लक्ष होत असून कित्येक महीने टीसीएल टाकले जात नसल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊन साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
गेले काही दिवसापासून मेढा नगरपंचायतीचा कारभार मुख्याधिकार्यांची बदली झाल्याने परकियांच्या कडे नगरपंचायतीचा कारभार वर्ग करण्यात आला असल्याने सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे कर्मचाऱ्यांना लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने जनतेमध्ये नाराजी पसरली आहे.
सध्या पाऊसाचा जोर वाढला असताना पिण्याच्या पाण्याच्या बोअर वेल ( हातपंप ) मध्ये वाहून येणारे घाण पाणी मुरले जात असून त्यामुळे लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. गत कित्येक महिने नगरपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या बोअर वेल ( हातपंप ) टीसीएल टाकण्यात आलेले नाही अगर केव्हा ही पाणी तपासणी करण्यात येत नाही असे सामान्य नागरीकांचे म्हणणे आहे.
बोअर वेल ( हातपंप ) व्यतीरिक्त काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असून त्यांच्या स्वच्छते बाबत आणि टीसीएल बाबत दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या नगरपंचायतीचा मुख्याधिकारी कारभार वर्ग असल्याने कर्मचारी गणिताच्या आकडेवारीत मग्न झाले दिसत आहेत.
साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून जनता आजारी पडल्यावर नगरपंचायतीला जाग येणार का ? नदीच्या पाण्याची पातळी खालवल्या नंतर भासणारा पाण्याचा तुटवडा हा बोअरवेल (हातपंप ) च्या माध्यमातुन पाण्याची तहाण भागाविणार्या हातपंपाकडे दुर्लक्ष करून जनतेला उन्हाळ्यात पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करायला लावणार का? अनेक हातपंप नगरपंचायती च्या दुर्लक्षामुळे बंद पडत चालले असून जे सुरु आहेत ते ही बंद पडावेत याचे नियोजन केले जाते आहे काय ? जुन्या बोअरवेल ( हात पंप ) च्या पाईप गंजल्या असून त्या बदलल्या जाणार कि नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना सध्या तरी जनतेच्या जिवीतास धोका होवू नये म्हणून हातपंपामध्ये टीसीएल टाकले जावे अशी मापक अपेक्षा सामान्य जनतेकडून होत आहे.फोटो – मेढा ( गांधीनगर ) येथिल पिण्याच्या पाण्याचा हातपंप व शेजारी वाढलेले गवत ( सोमनाथ साखरे )