स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत महत्वपूर्ण बैठक
सातारादि.१९. मुनावळे, कावडी, हातगेघर, वहागांव आदी गावच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध मागण्या प्रलंबित आहेत. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा. सातारा आणि जावली तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने आणि तातडीने सोडवा अशी सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत आ. शिवेंद्रसिंहराजे यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह जिल्हा पुनर्वसन विभाग, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
मुनावळे येथील कोयना प्रकल्पग्रस्तांचे अतिरिक्त भूसंपादन करण्यात आले होते. सुमारे ७१ खातेदारांची सातबाऱ्यावर नोंद नाही. त्यांची नोंद करून सातबारे उतारे देण्यात यावेत. कावडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन वेण्णानगर- साबळेवाडी येथे करण्यात आले आहे मात्र, त्यांना अद्यापही ताबा दिलेला नाही. हातगेघर येथील ग्रामस्थांना शेतीसाठी धरणातून ५० मीटर उंचीवर पाणी उचलून देण्यात यावे. वहागांव येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाचा प्रश्न अदयाप सुटलेला नाही. या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे केल्या. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डुडीयांनी दिले. तसेच वहागांव प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी दि. २५ रोजी वेगळी बठक लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी सरपंच निलेश भोसले, विलास भोसले, आनंद भोसले, बळीराम भोसले, पांडुरंग भोसले, किरण भोसले, दिनकर भोसले, राहुल भोसले, विजय भोसले, पांडुरंग भोसले, नितीन मानकुमरे, प्रमोद मानकुमरे, दत्तात्रय मानकुमरे, दिनकर मानकुमरे, जगन्नाथ शिराळे यांच्यासह मुनावळे, कावडी, हातगेघर, वहागांव येथील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.