स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा दि. 14(जिमाका). पावसाळा व साथीचे आजार यांच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.
जिल्हयामध्ये एका दिवसामध्ये 3878 तापाचे रुग्ण आणि अतिसाराचे 1104 रुग्ण आढळून आले असल्याचे वृत्त काही दैनिक व वाहिन्यांमध्ये प्रसिध्द झाले आहे. तथापि ही रुग्ण संख्या माहे जून 2023 व 12 जुलै 2023 पर्यंतचे असून सन 2022 मधील आकडेवारीशी तुलना करता सदरची रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली नाही. सदयस्थितीमध्ये वातावरणामधील बदलामुळे रुग्ण आढळून येत आहेत.
सातारा जिल्हयात सध्या पावसाळा व साथीचे आजाराच्या अनुषगांने विविध प्रकारे उपाय योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या सुचने नुसार दि 1 जुन ते 30 जुन 2023 मध्ये हिवताप व साथरोग जनजागरण अभियान राबवण्यात आले आहे. पावसाळयामध्ये पाणी उदभवांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी शुध्दीकरणांबाबत लक्ष केद्रीत करणेत येत असून, पिण्याचे पाणी उदभवांची पाहणी करुन पाणी नमुने तपासणसाठी गावनिहाय पाठवण्यात आले आहेत. गाव, वाडी वस्तीनिहाय सर्वत्र टि सी एल व मेडीक्लोर याचा साठा उपलब्ध करणेत आला असून ज्या ठिकाणी त्याचे प्रमाण कमी आहे त्या ग्रामपंचातीस सदरचा साठा त्वरीत उपलब्ध करुन घेणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.
सातारा जिल्हयातील सर्व वैघकिय अधिकारी, कर्मचारी यांना क्लोरिन टेस्ट किट देणेत आले असून ओटी सनियंत्रण करणेत येत आहे. जिल्हयातील सर्व प्रा आ केंद्रामध्ये साथरोगाशी निगडीत पुरेसा औषधासाठा आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तातडीचा औषधसाठा तयार करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व गावनिहाय आशा यांच्याकडे किरकोळ आजाराबाबतची औषधे उपलब्ध असल्याची माहितीही डॉ.शिर्के यांनी दिली.
000