
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——— अजित जगताप
सातारा दि.०३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून सर्व जाती धर्माला जुलमा पासून मुक्त करण्याचा विडा उचललेला. या कालावधीमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज व मावळे रणांगणात होते. आताही मराठा तरुण मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणारे सर्व आधुनिक मावळे हे मराठा आरक्षण चळवळीपासून प्रेरणा घेऊ लागलेले आहेत. त्यांनी स्वामी- महाराज व साधू आणि इतर अंधश्रद्धा पसरणाऱ्यांशी फरकत घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मोर्चा ला महाराष्ट्र राज्यातील मोठे यश मिळाले आहे. असे प्रतिपादन मराठा समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व व विचारवंत संजय जाधव यांनी सांगितले आहे.
सध्या महाराष्ट्रात संविधानात्मक निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या संविधानाच्या माध्यमातूनच मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण हवे आहे .यासाठी पाच कोटी मराठा बांधवांची अंतिम लढाई सुरू आहे. मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण हवे आहे .या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीतून लढा सुरू केले आहे. या लढ्याची मोठी व्यापक चळवळ उभी झालेली आहे. दि २५ ऑक्टोबर पासून जरांगे पाटील यांनी अमर उपोषण सुरू केले होते. याला राज्यभरातून उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. एवढेच नव्हे तर कायदेमंडळात कायदा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा गाव बंदीचा फटका बसला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देशांमध्ये मराठा आरक्षणाच्या अधिकारासाठी लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलनातून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळालेले आहेत.
वास्तविक पाहता मराठा आरक्षण हा प्रश्न गेले अनेक वर्ष सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या वकृत्वाने जटील करून ठेवलेले आहे. खरं म्हणजे मराठा आरक्षण देण्याची धमक आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्याकडे होती. पण त्यावेळेला काही कारणास्तव मराठा आरक्षण देण्यास शक्यता निर्माण झाली नाही. आता काळ बदललेला आहे.
आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात क्युरीटीव पिटीशन दाखल झाले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील न्यायमूर्ती शिंदे समितीचे काम सुरू आहे. आता जवळपास आरक्षणापर्यंत सर्व घडामोडी पोहचलेले आहेत. त्यामुळे मराठा बांधवांनी आत्महत्या न करता या आरक्षणाच्या बाजूने निकाल व्हावा. याची प्रतीक्षा करावी. कारण जरांगे पाटील हे जीवाची बाजी लावून लढत आहे अशा वेळेला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मराठा समाजाने आत्महत्या पासून परावृत्त झाले पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सर्व समाजामध्ये अंधश्रद्धा पसरली आहे.श्री सत्यनारायण पूजा ,यज्ञ ,महायज्ञ, भोंदू स्वामी, बुवा, साधू, महाराज यांच्या नादी लागून अंधश्रद्धा पसरवली जात आहे. वास्तविक पाहता मराठा समाजास नव्हे तर सर्व जाती धर्मामध्ये आदर्श घेणारे अनेक व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूजा करणे ही खरी श्रद्धा आहे. परंतु आज मराठा समाज हा आरक्षण मागत असताना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करीत आहेत . अशा वेळेला भोंदू साधू- संत- बुवा- महाराज यांची आठवण होत नाही. हे खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे. आणि मराठा क्रांती मोर्चाचे यश आहे. असेही अभ्यासक संजय जाधव यांनी स्पष्ट केले.
या त्यांच्या भूमिकेला मराठा समाजातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. आजपर्यंत मराठा समाजाने अनेक मंदिर उभी केली. कुलदैवत सोडले तर फक्त काही लोकांच्या पैशातून अनेकांनी आपली संधी साधून घेतली. पण, आता मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आतापर्यंत कुठल्याही देवस्थान व इतर साधू महाराज, बुवा यांनी पाठिंबा दिलेले नाही. हे सुद्धा आता मराठा समाजाला लक्षात घ्यावेत असे सुचित करण्यात आलेले आहे. अशीच भूमिका सातारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेले तरुण अजित निकम, प्रशांत पवार, विकास जाधव,अभिजीत मोरे, सुरेश मोरे, राजेंद्र कदम, चंद्रकांत जाधव, यांनी घेतली आहे.