जिल्हाधिकारी सातारासातारा

शिवप्रताप दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

पुणे दि.५. प्रतापगड येथे १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणारा शिवप्रताप दिन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

शिवप्रताप दिन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने वाहतूक व्यवस्था, त्यासाठी एसटीच्या जादा बसेस, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची व्यवस्था आदी मूलभूत सोयी सुविधांचे नियोजन करावे. पोलीस विभागाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. आरोग्य पथके, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसरात फुलांची सजावट, आकर्षक प्रकाशव्यवस्था तसेच दरवर्षीप्रमाणे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवष्टीसाठी व्यवस्था करावी. साहसी खेळ प्रकारांचे सादरीकरणासाठी समन्वय करावा. अखंडित वीजपुरवठा होईल हे पाहावे. गडावर जाणाऱ्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करावे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी शिवप्रताप दिन सोहळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली.

बैठकीस पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, महाबळेश्वर आणि पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!