
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —– सुरेश पार्टे
मेढा.दि.१२. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ११ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय भाषा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे भाषा मंडळ ,व छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी,हिंदी,संस्कृत व अर्धमागधी,सांस्कृतिक विभाग व ज्युनियर कॉलेज विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरवातीस माझी भाषा माझी स्वाक्षरी या उपक्रमात प्राचार्य ,प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मातृभाषेत सह्या केल्या.या वेळी रयतवाणी रेडिओ स्टेशनचे प्रमुख सचिन मेनकुदळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या भाषा उत्सव कार्यक्रमात बोलताना सचिन मेनकुदळे म्हणाले की ‘भारतीय भाषा उत्सव देशात एकात्मता निर्माण करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल. अनेक संस्कृती ,भाषा यांची देवाण घेवाण आपल्याला उपयुक्त ठरत असते. रयतवाणी तर्फे सर्व प्रकारच्या कार्यक्रमाना आम्ही महत्व देत असून विविधता आपण जपत आहोत’ असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले की ‘अनेक भाषा शिकण्याने अधिक ज्ञान मिळत असते. प्रत्येक भाषेत विविध प्रकारचे ज्ञान आहे. आपल्या भारतीय भाषा आपला सांस्कृतिक वारसा असून आपण प्रत्येकाने भारतीय भाषा बोलल्या पाहिजेत . भारतीय भाषा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष वाघमारे व विविध भाषा विभागातील प्रमुख यांचे कौतुक केले. उद्घाटन सत्रानंतर झालेल्या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रारंभी जम्मू कश्मीर येथील बी.ए.३ मधील विद्यार्थिनी शबनम खालिद हिने गोजरी भाषेत आपले मनोगत व्यक्त करीत काश्मिरी संस्कृतीची माहिती दिली. ती म्हणाली की गर्मीमध्ये लोक काश्मीरला जातात व थंडीमध्ये ते जम्मू मध्ये येतात. भेड बकरीया हे लोक पाळतात,गुज्जर और बकरवाल जमातीचे लोक आहेत अशी ती म्हणाली. संस्कृत विभागाचा विद्यार्थी आकाश थोरात याने संस्कृत भाषेत भगवतगीतेचा बारावा अध्याय सादर केला. मेघा सिंग,हिने जम्मूत जे लोक आहेत त्यांना डोग्रा म्हणतात.भाषेचे नाव डोग्री आहे. गुलाबसिंग महाराज यांना तिथे हे लोक मानतात हे सांगून तिने संस्कृतीची माहिती दिली. काजल पंडीत हिने भोजपुरी गीत सादर केले. तर प्रज्योत दिकोडे याने हिंदी भाषेचे महत्व हिंदीत सांगितले .
संतोष हादमिनी यांनी कन्नड भाषेत मनोगत व्यक्त केले. जम्मूचे रज्जबअली चौधरी यांनी आपण गुज्जर और बकरवाल जमातीचे ,असून सीमारेषेलगत गाव बालाकोट येथे राहत होतो.या परिसरात राहताना दोन्ही कडून गोळीबार होई. यात आमची माणसे मुले मरत असत असा त्रास होत असल्याने आम्ही स्थलांतर करून पुँछमध्ये आलो. आमची जमात भटकी आहे. मकेची रोटी ,लस्सी ,तूप ,दही ,सरसी भाजी हे मुख्य अन्न आहे. आमचे आरोग्य खूप छान असते. आमचे लोक जास्तीत जास्त शाकाहारी आहेत असे तो म्हणाला.गोजरी भाषेत त्यांने मनोगत व्यक्त केले. इरफान बशीर मियार याने ,काश्मीरचा इतिहास ,कृषी,निसर्ग,सफरचंद ,भात ,दुध ,काश्मिरी भाषेमध्ये त्याने सर्व माहिती दिली.
सांस्कृतिक विभागातील संजना वाघमळे व दृष्टी रुईकर यांनी विविध भारतीय भाषेत गीते गायली. हार्मोनियम वादन दीपक सपकाळ यांनी केले तर तबलावादन सोमनाथ वाडेकर यांनी केले. रोहिणी पवार आणि अंकिता सावंत यांनी कोळी नृत्य सादर केले ,तर आकांक्षा ,अनुराधा आणि सानिका या विद्यार्थिनीनी दाक्षिणात्य गाण्यावर नृत्य केले. भारतातील विविध भाषेत विद्यार्थी बोलत असताना विद्यार्थी मनापासून ऐकत होते.विविध भाषेतली गाणी उत्सुकतेने ऐकत होते. तर कोळीनृत्याच्या अदा पाहून प्रेक्षक मनोमन आनंद घेत होते.
प्रारंभी प्रास्ताविक भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या प्रा.डॉ.रोशनआरा शेख व डॉ.विद्या नावडकर यांनी केले . या कार्यक्रमास प्रा, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.गणेश पाटील,पर्यवेक्षिका प्रा.आसावरी शिंदे, प्रा.डॉ.सविता मेनकुदळे, प्रा.मनोज धावडे ,प्रा. विजया गणमुखी प्रा.ज्युनियर,सिनियर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.