मेढा.दि.०१.अतिवृष्टीमुळे जावली तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे याबाबत प्रशासनाने सर्वेक्षण करुन त्वरित पंचनामे करावे यासाठी जावली तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तहसिलदार हणमंत कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांसह शेतकऱ्याच्या राहत्या घरांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.प्रामुख्याने येथील परिसरात भाताचे मुख्य पिक घेतले जात असले तरी त्याबरोबर सोयाबीन, भुईमुग, घेवडा, पावटा, नाचणी आदी पिके घेतली जातात. जुलै महिन्यामुध्ये पावसाने थैमान घातल्याने या पिकांवर त्याचा पावसाचा मोठा परिणाम दिसून येते आहे अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली आहेत.शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनघरांची झालेली पडझड व पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे होवून जनतेला त्याची नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी पंचनामे तात्काळ होणे गरजेचे आहे असे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जावली तालुकाध्यक्ष साधु चिकणे यांनी सांगितले.
मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाएवढे देखील उत्पादन निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी संकटात आला आहे.शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीचे निवेदन तहसिलदार हणमंत कोळेकर यांना दिले असल्याची माहिती साधु चिकणे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव प्रकाश कदम उपस्थित होते.