
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
३ लाख मे. टन गाळप करून हंगामाची यशस्वी सांगता
मेढा. दि.१५. सातारा- जावली तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड साखर कारखाना ऊस पुरवठादार शेतकरी आणि कामगार यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून पुन्हा सुरु झाला आहे. या पहिल्याच गळीत हंगामात कारखान्याने ३ लाख १ हजार ५१ मे. टन गाळप केले आहे. अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा राहिला. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांनी असेच सहकार्य ठेवल्यास आज ना उद्या, दोन- पाच वर्षांनंतर प्रतापगड कारखाना हा सातारा जिल्ह्यातील उच्चतम दर देणारा कारखाना असा नावलौकिक मिळवेल, असा विश्वास अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
तीन- चार वर्ष बंद अवस्थेत असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने पुन्हा सुरु करण्यात आला. प्रतापगड कारखान्याचा पहिलाच गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला. हंगामाची सांगता अंतिम ११ पोत्यांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अधिकारी व कामगारांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, रविंद्र परामने, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण कापसे, दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अनंत अडचणी असताना ऊस पुरवठादार शेतकरी आणि कामगार- कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच प्रतापगड कारखाना पुन्हा सुरु झाला आहे. लालसिंग काकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. जावली, वाई, खंडाळा, कोरेगाव, भोर येथील उसपुरवठादार शेतकऱ्यांनी आपला ऊस पुरवला त्यांचे आणि सर्व कामगार- कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी मिळून एक टीम म्हणून काम केले आणि त्याचे फलित म्हणून जावलीतील शेतकऱ्यांचे हक्काचे सहकार मंदिर पुन्हा उभे राहिले आहे. दराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रतापगड कारखान्याने ३ हजार रुपये प्रतिटन दर दिला. आता हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला आहे. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे. त्यामुळे पुढील हंगामातही सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे. आज ना उद्या, पुढील दोन- पाच वर्षात प्रतापगड कारखाना जिल्ह्यातील सर्वात जास्त दर देणारा कारखाना अशी ओळख कारखान्याची झाल्याशिवाय राहणार नाही.

कामगारांनी केलेल्या अनमोल सहकार्याची दखल म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशासनाच्यावतीने त्यांना बक्षीसही देण्याची घोषणा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. संस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. बँक व तोडणी, वाहतूक यंत्रणा यांची देणी आहेत. त्यामुळे काटकसरीचे नियोजन करूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. आगामी काळात डिस्टिलरी, इथेनॉल निर्मिती आदी प्रकल्प सुरु करून कारखान्याचे उत्पन्न्न वाढवण्यावर भर दिला जाईल. शेअर्स वाढवणे, टप्प्याटप्प्याने भागभांडवल वाढवणे हि कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे हि संस्था पूर्ण सक्षमपणे उभी राहावी यासाठी आपण सर्वांनी कायम सहकार्य ठेवावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले. दरम्यान, तालुक्यातील विकासाबाबत बोलण्यापेक्षा मी कृतीतून दाखवून दिले आहे. पाचवड, मेढा ते शेंबडी या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. मुनावळे येथे जलपर्यटन सुरु केले आहे. तालुक्यातील पर्यटन वाढीवर भर दिला असल्याचे ते म्हणाले.
सौरभ शिंदे म्हणाले, बंद पडलेला कारखाना बाबाराजेंच्या साथीमुळे पुन्हा उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सहकार्याने कारखाना सुरु झाला. अनेक अडचणी आल्या पण, बाबराजेंच्या पाठिंब्यामुळे ३ लाखापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट गाठले. पुढेही याच पद्धतीने प्रतापगड जिल्ह्यातील अग्रेसर कारखाना म्हणून नावारूपाला आणू. ३- ४ वर्ष कारखाना बंद होत. आता कारखाना शून्यातून उभा राहिला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी हंगामही यशस्वीपणे पार पाडू. आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळे गावागावात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही निवडणूकीची चिंता नाही पण, बाबाराजेंच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळालेच पाहिजे, असे शिंदे म्हणाले.