स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा.दि.२६.प्रतिनिधी. मातांनी सदृढ बालक जन्माला येण्यासाठी संतुलीत आहार घेणे महत्वाचे आहे.तसेच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे महत्वाचे आहे.यासाठी शासन आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असून त्याचा उचित लाभ घेतला पाहिजे असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा ज्योती लंगुटे यांनी केले.
सातारा येथे पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात संपन्न झाला त्यांच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्र शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण माह दिनांक 1.9.2024 ते 30.9.2024 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व वेगवेगळे उपक्रम घेऊन पोषणाची लोक चळवळ (जन आंदोलन) उभे करण्याकरिता अतिशय उत्साहात राबवायच्या सूचना माननीय आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोषण अभियानांतर्गत साई दत्त मंगल कार्यालय, वाडे फाटा, सातारा येथे पोषण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटक ज्योती लंगुटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पुर्व यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी दीपक ढेपे बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा नागरी पश्चिम, अंगणवाडी पर्यवेक्षिका हेमलता मोरे, विद्या आगवणे, मनीषा गुरव, रेखा घोरपडे, नलिनी पाटील तसेच बाल विकास सातारा नागरी पश्चिम प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. पोषण मेळाव्याचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे यांनी केले. ते म्हणाले, सन 2018 पासून पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली असून पोषण अभियान अंतर्गत माहे सप्टेंबर 2024 या महिना 7 वा पोषण माह साजरा करण्यात येत आहे.
या पोषण महिन्यांमध्ये जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर, बीट स्तरावर, प्रकल्प स्तरावर आणि जिल्हास्तरावर पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा येथे प्रकल्प स्तरावरील पोषण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या पोषण मेळाव्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण मंगळागौर, पोषण भारुड, पोषण नाटिका, बेटी बचाव बेटी पढाव व स्त्रीभ्रूण हत्या यावरील नाटिका, पोषण कविता व पोषण गीते उत्तम प्रकारे सादर केली. त्याबद्धल त्यांनी सहभागी सर्वांचे कौतुक केले.
या पोषण मेळाव्यासाठी सातारा, मेढा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद आणि फलटण या शहरातील 350 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांनी केले. आभार अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या आगवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.