जिल्हाधिकारी सातारासातारा

शासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
फलटण दि.०२. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सातारा जिल्ह्यातील वास्तव्यादरम्यान शासकिय यंत्रणेच्या प्रत्येक विभागाने स्वच्छता, पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
दि. १ जुलै रोजी लोणंद, तरडगाव, फलटण पालखी तळ आणि सोहळ्याच्या विसाव्याची ठिकाणे, पालखी महामार्ग, अंतर्गत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी सुविधांबाबत काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतल्यानंतर फलटण पालखी तळावर स्थानिक पत्रकारांशी जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे, पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ग्रामोपाध्ये, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*चांदोबाचा लिंब येथील मंदिराची पुर्नउभारणी : विसाव्याच्या ठिकाणी नवीन ओटे*
फलटण तालुक्यातील नियोजनाची माहिती देताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले, पडेगाव ते राजुरी (सोलापूर जिल्हा हद्द) असा फलटण तालुक्यात पालखी सोहळ्याचा प्रवास ५० कि. मी. असून, ३ मुक्काम होणार आहेत. पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडते, त्या चांदोबाचा लिंब येथील पुरातन मंदिराचे स्थलांतर जानेवारी २०२४ मध्ये करुन, पहिल्या जागेपासून पाठीमागे काही अंतरावर नवीन मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर विडणी, पिंप्रद येथील विसाव्याच्या ठिकाणी नवीन ओटे पाठीमागे स्थलांतरीत केले आहेत.
*तरडगाव पालखी तळ विस्तार : ११ कोटी ४० लाख भूसंपादन खर्च*
तरडगाव पालखी तळासाठी एकूण ५•६९ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यासाठी ११.४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
तरडगाव पालखी तळ येथे पालखी सोहोळा
जाण्यासाठी विश्वस्तांच्या सूचनेनुसार रस्ता तयार करण्यात आला आहे.
*साधूबुवा मंदिरासाठी कॉंक्रिटचा रस्ता : २० लाख रुपये खर्च अपेक्षीत*
राजुरी येथील साधू बुवाच्या मंदिरात जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रिटी करणासाठी २० लाख रुपये खर्च होणार आहे.
*वीर धरणातून ०.८५ टीएमसी पाणी सोडणार : ५० टँकरद्वारे पाणी पुरवठा*
पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यात ०.८५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. फलटण नगर परिषद यांच्यावतीने पालखी मार्गावर ३४ शासकीय व खाजगी १६ अशा एकूण ५० टँकरद्वारे पालखी तळावर पाणी पुरवठा व्यवस्थापन करण्यात आले आहे.
*१२ हजार गॅस सिलेंडर उपलब्ध होणार*
पुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील १० गॅस एजन्सीच्यावतीने वारकऱ्यांना गॅस वितरण करण्यात येईल, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या माध्यमातून १२ हजार अतिरिक्त गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
*वैद्यकीय पथके, औषध साठा, रुग्णवाहिका सुविधा : सर्प व श्वान दंश इंजेक्शन उपलब्ध*
आरोग्य विभागाच्यावतीने ९ स्थिर वैद्यकीय पथके व पालखीतळावर ३ पथके तैनात करण्यात येणार आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे आरोग्य सुविधा उपलब्ध असतील. सर्प व श्वान दंशाच्या प्रत्येकी १५० लसीची उपलब्धता असणार आहे, तसेच शासकीय व खाजगी मिळून १५ रुग्णवाहीका उपलब्ध राहणार आहेत.
*एस. टी. महामंडळ तात्पुरती बस स्थानके उभारणार*
एस. टी. महामंडळ फलटण आगाराच्यावतीने जिंती नका, मुधोजी कॉलेज, शिगणापूर रोड कोळकी व गोविंद दूध डेअरी या ठिकाणी तात्पुरती बस स्थानके तयार करण्यात येणार आहेत.
*नगर परिषद आरोग्य, स्वच्छता, पाणी, रस्ते, वीज पुरवठा करणार*
फलटण नगर परिषद पालखी मार्गांवर १० ठिकाणी १३०० तात्पुरती स्वछतागृहे उभारणार आहे. पालखीतळावर नियंत्रण व आपत्ती कक्षाची उभारणी करण्यात येईल. वारकऱ्यांना अनाधिकृत फेरीवाले,अतिक्रमणधारक, लहान मोठ्या टपऱ्या यांचा त्रास होऊ नये यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येतील.
*अन्न औषध प्रशासन सज्ज*
अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ५ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे, या पथकांद्वारे पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या, पालखी मार्गावरील व पालखी मुक्काम ठिकाणचे खाद्यगृहे, हॉटेल, मिठाई दुकाने, खाद्यांचे गाडे यांची अचानक तपासणी होणार आहे.
*तात्पुरती शौचालये व खाजगी शौचालयांची सुविधा उपलब्ध*
लोणंद ते साधू बुवाचा ओढा, राजुरी या मार्गावर ३ मुक्काम व ८ विसाव्यांच्या ठिकाणी ४५०० तात्पुरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील गावे व फलटण शहरात १७ हजार ७६६ खाजगी व सार्वजनिक शौचालये नागरिकांनी उपलब्ध करुन द्यावीत असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
याव्यतिरिक्त पालखी मार्गावरील मंगल कार्यालये, अनिवासी व निवासी हॉटेल, पेट्रोल पंप अशा ९८ ठिकाणी एकूण १९६ शौचालये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १३ गावामध्ये प्रत्येकी १० आउटलेट असलेले २६ स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत.
*महावितरण अखंडित वीज पुरवठा, सुरक्षा, तात्पुरती वीज जोडणी साठी सज्ज*
महावितरणच्यावतीने पालखीतळ व पालखी मार्गावरील ट्रान्सफर्मरला सुरक्षा कवच लावण्यात येणार आहे. दिंड्यांना तात्पुरती वीज कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. सार्वजनिक शौचालय ठिकाणी विद्युत पुरवठा करण्याबरोबर मोबाईल चार्जिंग पॉईंटची निर्मितीही करण्यात येईल. पालखी मार्गावरील विद्युत वाहिनी तारा याची दक्षता घेण्याबरोबरच तात्पुरती वीज कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात येईल.
*पालखी तळावर नियंत्रण कक्ष*
पालखी सोहळा येथील वास्तव्य काळामध्ये संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण व समन्वयासाठी पालखी तळावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच आषाढीवारी संपर्क पुस्तिका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेत सर्व अधिकारी कर्मचारी, पालखी सोहळा विश्वस्त, जिल्हास्तरीय सर्व विभाग प्रमुख, आरोग्य व फिरते वैद्यकीय पथक, पशुधन विकास अधिकारी, पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण व संपर्क अधिकारी तसेच अन्य विभागातील अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक व माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!