
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कास.दि.०८ कोयना विभागातील सामाजिक संघटना (सोळशी विभाग)ता. महाबळेश्वर / जावली यांच्या वतीने सोळशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाबाबत सांगताना संघटनेचे अध्यक्ष धोंडिबा संकपाळ म्हणाले, आपल्या समाज व्यवस्थेला परंपरा आणि इतिहास आहे. ही समाजाची परंपरा जपण्याची आणि समाज व्यवस्था समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. समाजातील अनेक बुजुर्ग आणि जाणकार माणसांनी समाज व्यवस्था निर्माण केली. अनेक वेगवेगळ्या समाज विघातक घटनांना दूर सारुन समाजसेवकांनी ही परंपरा टिकवली. समाजातील सामान्य माणसाचा विचार करून समाजातील सर्वांच्या भल्यासाठी ही व्यवस्था टिकवणे गरजेचे आहे म्हणून ३२ गाव समाजाचा वार्षिक सोळशी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
समाजात आजपर्यंत उल्लेखनीय काम करणाऱ्या दिवंगत समाजबांधवांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. तर आजही काही अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेले समाज कार्यकर्ते समाज व्यवस्थेत भरीव काम करत आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा, शेती, सांस्कृतिक , उद्योगजगतात आणि इतर क्षेत्रातही उल्लेखनीय काम करून समाजापुढे आदर्श उभा केला आहे. अशा लोकांचा यथोचित सत्कार करून समाजाच्या कामासाठी अधिक तरुण प्रेरित होतील.
तसेच ३२ गाव समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणून एक चांगल्या विचारांची साखळी तयार व्हावी या हेतूने हा सोळशी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी या सोळशी उत्सवाला सर्व समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष कोंडीबा कदम, सचिव संजय संकपाळ, खजिनदार अरूण कदम यांनी केले आहे.



