कांदाटी खोऱ्यातील अत्यंत दुर्गम अशा शेलटी येथील विद्यार्थ्यांना भरघोस अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्टार ११ महाराष्ट्र / सुर्यकांत पवार (सर)
कास.दि.१५.गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वात अतिदुर्गम अशा कांदाटी खोर्यातील शेलटी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी चालू असलेला जीवघेणा संघर्ष सोशल मीडिया च्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांनी आता त्याची दखल घेतली असून काल शेलटी मधील विद्यार्थ्यांना समाजसेवक जयवंत निकम यांच्या माध्यमातून भरघोस अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.दुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळेप्रती असणारी कृतज्ञता तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या कुशीत अर्थातच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्याच्या आणि शिवसागराच्या तीरावर वसलेलं एक घर एक खेडं असे या गावचे वैशिष्ट्य आहे. या गावात झोरे आडनावाचे फक्त एकच कुटुंब आहे. हे कुटुंब कोयना धरण होण्यापूर्वी पासूनच या ठिकाणी वास्तव्यास आहे. या गावात कोणतीही सोय नसल्याने येथील मुलांना सुमारे अर्धा पाऊण तास जीवघेणा प्रवास करून होडी वल्हवत वादळ, वारे, पाऊस याची तमा न बाळगता शिक्षणासाठी पिंपरी येथे जावे लागते. ही मुले जी होडी वापरत आहेत त्यामध्येही अनेकदा पाणी जाते. आयुष्यावर उदार होऊन त्यांना प्रवास करावा लागतो. पिंपरी येथे पोहोचल्यानंतरही तेथील प्रायव्हेट बोटीने तापोळा येथे जावे लागते. ही बोट न मिळाल्यास तब्बल ९ किमी. अंतर पायी तोडत ही मुले शाळेत जातात.
आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी अशी भरघोस मदत केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.यावेळी जयवंत निकम, अक्षय गोरे, आदित्य हिंगमिरे, मिलिंद चोरगे, राजेंद्र संकपाळ, सुभाष गोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.



