
स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.१५. श्रमीक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्या नेतृत्वाखाली बोंडारवाडी धरणासाठी ५४ गावातील लोकांचा २३मार्च २०२२ रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार दिनांक ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदाचे अधिकारी , श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅक्टर भारत पाटणकर, बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.मा.शेखर सिंह, जिल्हाधिकारी यांनी ५४ गावांना शेती व पिण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी तुमचा संघर्ष चालू आहे.
५४ गावांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहीजे असे मलाही वाटते. मात्र त्यामधे काही कायदेशीर अडचणी आहेत. त्यावर मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे थोडा अधिकचा वेळ लागू शकेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले. शेती व पिण्यासाठी एकत्रित बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव सिंचन विभाग व प्रकल्प मंडळ, साताराने संयुक्त पणे तयार करून मुख्य अभियंता,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
अगोदरचा पिण्याच्या पाण्याचा प्रस्तावामुळे बाधीत होणारी जमीन व वाढीव क्षमतेच्या शेतीच्या पाण्यासाठी होणाऱ्या धरणासाठी किती अतिरिक्त जमीन संपादित करावी लागेल याचे सर्वेक्षण करण्यात यावे. वाढीव क्षमतेच्या धरणामुळे होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे योग्य निवारण करण्यात यावे अशाप्रकारचे सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.
या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅक्टर भारत पाटणकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजीत बोराडे, अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, कार्यकारी अभियंता काशिद , श्रमीक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



