
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
सातारा दि. 20 : कराड येथे 24 ते 28 नाव्हेंबर 2023 या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये कृषि विषयक जास्तीत जास्त स्टॉल उभारुन शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांच्या माहितीसह नैसर्गिक शेती व बांबू लागवडीची प्राधान्याने माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये बांबू लागवड विषयी स्वतंत्र स्टॉल उभा करुन याद्वारे बांबू पासून उत्पादित होणाऱ्या मालाची व अनुदानाची माहिती द्यावी. प्रदर्शनाला जास्तीत जास्त शेतकरी भेटी देतील असे नियोजन करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, कृषि शास्त्रज्ञ, कृषि संलग्न विभागतील तज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त, प्रयोगशील शेतकरी, यशस्वी महिला शेतकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करावे. त्याचबरोबर कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखीनय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचीत सन्मान करुन स्मृती चिन्ह वितरीत करावे.
शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटावे यासाठी ठिबक सिंचन, सिमेंट बंधारे, वनराई बंधारे यासह पाणी बचतीच्या विविध उपायोजनांची माहिती प्रतिकृतीच्या माध्यमातून द्यावी. महोत्वामध्ये शेतकरी गट, शेतकरी कंपनी व शेतकरी यांना प्रथम येणाऱ्या ‘प्रथम प्राधान्य’ या तत्वावर मोफत स्वरुपामध्ये स्टॉल देण्यात यावेत. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळेचेही आयोजन करावे. तसेच नैसर्गिक शेतीविषयक स्वतंत्र स्टॉलची उभारणी करावी. कृषि प्रदर्शनामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी कराड नगर परिषदेने कर्मचारी नेमावेत, अशा सूचनाही श्री. डुडी यांनी केल्या.
00000