महाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी पर्यटनासोबतच वनौषधी,बांबू लागवडी सारखे उत्पन्नाची साधने तयार करा….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-

सातारा, दि.21: कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यावर प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकी प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असल्याने कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व त्यामुळे जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची निर्माण झालेली संधी या अनुषंगाने तात्काळ गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा.

जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकऱ्यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उपन्नत वाढावे यासाठी जिल्ह्यात कृषी पर्यटनावर भर देण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले.

जिल्हा परिषदेकडील असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी तापोळा येथील पोलीस चौकी सुधारणेचे काम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे सांगितले.
0000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!