जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद पडल्याने विद्यार्थांचे भवितव्य अंधारात

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
मेढा -दि.२६. जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असून विविध प्रकारचे शेकडो दाखले रखडले आहेत. पालकांसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शैक्षाणिक व नोकर भरती साठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होताना दिसत आहे. दाखल्यांची कामे सुरुळीत होऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नविनच कार्यभार स्विकारलेले तहसिलदार हणमंत कोळेकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या शाळा, कॉलेज, डिप्लोमे यांचे प्रवेश प्रक्रिया तसेच नोकर भरती सुरु असताना ऑनलाईन मिळणाऱ्या दाखले वेळेत मिळत नाहीत. उत्पन्न दाखला, नॅशालिटी , रहिवाशी ( डोमाशिअल ), जातीचा दाखला, नॉन क्रिमिलअर दाखला आदी विविध प्रकारच्या दाखल्यांची शाळा प्रवेश आणि नोकरी निमित्त गरज भासत असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
दाखले मिळविण्यासाठी सकाळपासुनच गर्दी होत आहे. जावली तालुका हा भौगोलीक दृष्ट्या दऱ्या खोऱ्यांचा डोंगराळ तालुका आहे. त्यामुळे वेळेवर वाहणे मिळत नसल्याने लोक उपाशीपोटी तहसिल कार्यालयात सकाळपासुनच येत असतात. सायंकाळ पर्यत काम होईल या आशेने थांबलेले पालक सायंकाळी नाराज होऊन दुसऱ्या दिवशी परत कार्यालयात हजर राहत असताना दिसत आहेत.
दि. १२ पासुन सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद पडले असल्याचे लेबल चिकटवण्यात आले असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जलद गतीने प्रशासन चालावे यासाठी ऑललाईन प्रणाली वापरली जात असताना ४५ दिवसांची मुदत दाखले मिळण्यासाठी मिळत असल्याने ऑनलाईन प्रणालीचा उपयोग काय ? जर आर्थिक व्यवहार क्षणात होत असतील तर ऑनलाईन दाखल्यांना ४५ दिवस का लागतात हा संशोधनाचा विषय नाही काय ? मुळातच अर्ज दाखल करण्यासाठी तलाठ्याचे, ग्रामसेवकाचे दाखले गोळा करण्यासाठी १० ते १५ दिवस लागत असतील आणि ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी ४५ दिवस लागत असतील म्हणजे दोन महिने दाखले मिळविण्यासाठी लागत असतील तर शाळा, कॉलेज प्रवेश घेण्याच्या तसेच नोकर भरती यांच्या मुदती महिण्याच्या आतच का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्यावेळी ऑनलाईन प्रणाली अंमलात नव्हती त्यावेळी हेच दाखले मिळविण्यासाठी ७ दिवस ते १५ दिवस मुदत असायची मग आता ऑनलाईन प्रणाली विकसित झाल्यानंतर २ दिवस ते ५ दिवस मुदत असणे गरजेचे आहे. दाखले उशिरा मिळण्याच्या प्रक्रियेमुळे आर्थिक भ्रष्टाचार होण्याचा धोका निर्माण होत आहे.
जिल्हाधिकारी यांनी निव्वळ शासन आपल्या दारी योजना राबवुन चालणार नाही तर चालणाऱ्या योजना जलद गतीने चालण्यासाठी प्रत्यत्न करणे गरजेचे आहे. जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद पडल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तो त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.