स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——- अजित जगताप सातारा
भीमाबाई आंबेडकर पुरस्कार छाया कोरेगावकर यांना प्रधान
सातारा.दि.२८. भारतीय संविधान अधिक भक्कम करणे व त्याप्रमाणे राज्यव्यवस्था चालवणे हे शासन, संसद, न्यायालय व नागरिकांचे कर्तव्य आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचा २५ वा महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ,कवयित्री “रिक्त -विरक्त ” कादंबरीच्या लेखिका छाया कोरेगावकर यांना किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संविधान दिनी सातारा येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी ते ‘भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर भाषण करताना ते बोलत होते.देशासमोरील आव्हाने व धोके विषद करणारे मूलभूत स्वरूपाचे विश्लेषण त्यांनी यावेळी केले.विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे ,उपाध्यक्ष रमेश इंजे , कार्यवाह ॲड .हौसेराव धुमाळ, विश्वस्त प्रा. प्रशांत साळवे उपस्थित होते.
किशोर बेडकिहाळ म्हणाले, संबोधी प्रतिष्ठान गेले ३७ वर्षे अखंडपणे व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधनाचे उत्तम प्रकारे कार्य करीत आहे.बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या नावाने योग्य महिलांचा २५ वर्षे गौरव करण्यात येत आहे.यावर्षी कोरेगावकर यांची उचित ,अभिनंदनीय निवड केल्याबद्दल संबोधी प्रतिष्ठानला धन्यवाद.
भारतीय संविधानावर बोलताना किशोर बेडकिहाळ म्हणाले, संविधान संकटात आहे .ते बदलणे कठीण आहे .मात्र त्यातील एकही शब्द न बदलता तिचा गैरवापर करून संविधान चौकट बाजूला टाकून एकाधिकारशाही निर्माण करण्यात होईल असा धोक्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता.संविधानाचे भवितव्य ते राबविणाऱ्या चांगल्या किंवा वाईट सत्ताधाऱ्यांच्या वरच अवलंबून आहे. जात ,धर्म यापेक्षा मी अंतिमतः भारतीयच आहे. असे बाबासाहेब म्हणाले होते.भारतीय संविधानाने व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य दिले आहे मात्र धर्माला व्यक्तींचे जीवन नियंत्रित करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. भारतीय संविधानाने भारतीयत्वाची दिलेली संकल्पना धर्मनिरपेक्ष अशीच आहे. मग्रुर धर्मसत्ता तिला मान्य नाही.
या शानदार सोहळ्यात संबोधी प्रतिष्ठानच्या कार्यास बहुमोल आर्थिक सहकार्य करणारे आयुर्विमा महामंडळातील निवृत्त अधिकारी भास्कर फाळके व अनिल बनसोडे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे किशोर बेडकिहाळ यांचे हस्ते करण्यात आला.प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास नगर येथील प्रा. महमूद सय्यद आवर्जून आले होते. संबोधी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष केशवराव कदम,प्राचार्य डॉ.संजय कांबळे,छाया कोरेगावकर यांच्या भगिनी सुनीता व त्यांचे जीवनसाथी अनिल भोंडवे , विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले, ॲड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.प्रा.प्रशांत साळवे यांनी संचलन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महामानव मानव मुक्तीचे शिल्पकार आहेत. राजकारणी लोकांकडून बौद्ध – मातंग समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. हे लक्षात घेऊन आपला डी एन ए कोणता हे ओळखून सर्वच समाजाने समन्वय समन्वयाची भूमिका घेऊन काम करण्याची गरज आहे.शोषितांचा संहार करण्याचा वणवा पेटला आहे. अशावेळी संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे असे छाया कोरेगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सत्कारला उत्तर देताना सांगितले.
**********डीएनए ओळखा : छाया कोरेगावकर