स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
जिल्हा परिषद बचत गटातून २ लाख वंचित कुटुंबांना ७०० कोटी अल्पव्याजी कर्जाचा लाभ;
सातारा१६: वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अडकलेल्या गरीब गरजू कुटुंबांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देत दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम केले असल्याचे सांगून गेल्या पाच वर्षात उमेद उमेद परिवारातील दोन लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित भारत संकल्प यात्रा विशेष मोहिमेत सातारा जिल्ह्यात ११ कोटी रुपये अर्थसहाय्य महिला बचत गटांना देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली आहे.
सध्या राज्यभर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान आज १६ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील बचत गटांना वेगवेगळ्या निधी बरोबरच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदराचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.
खिलारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये विविध मायक्रो फायनान्स कंपन्या २४ ते ३६ टक्के इतक्या भरमसाठ व्याजाने कर्ज वाटप करून गरजू वंचित घटकांचे शोषण करत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी फायनान्स ककंपन्यांच्या विळख्यात अडकलेल्या वंचित घटकांना उमेद अभियानाने बचत गटाच्या माध्यमातून संघटित केले आहे. त्यांची सावकारी कर्ज भागवण्याबरोबरच खावटी गरजा पूर्ण करण्यासाठी ७ टक्के इतक्या अल्पदरात राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून बचत गटांना प्रतिगट दीड ते तीन लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवठा केला आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन महिलांना कमी व्याजाची कर्ज उत्पादक गुंतवणूक याबाबत जागृत करून उद्योग व्यवसायासाठी ही त्यांच्या मागणीनुसार अल्प व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. आज पर्यंत सातारा जिल्ह्यात सुमारे सातशे कोटी रुपये उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात महिलांना देण्यात आले आहेत. यातून महिलांनी उद्योग व्यवसायाची उभारणी करून स्वतःची उपजीविका वाढवली आहे.या कर्जाची परतफेड ही नियमितपणे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सन २०१९ पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. आजअखेर अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये २२७७६ स्वयंसहाय्यता समूहामध्ये २ लाखापेक्षा अधिक महिलांचे संघटन करण्यात आलेले असून गावस्तरावर ११६८ ग्रामसंघ तसेच प्रभागस्तरावर एकूण ६१ प्रभागसंघ स्थापना करण्यात आलेली आहे. अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता समूहातील विविध सदस्य शेती आधारित उद्योग व्यवसाय तसेच बिगर शेती उद्योग व्यवसाय करीत असून विविध उत्पादने तयार करीत आहेत.
उमेद अभियानात समाविष्ट बचतगटांना सन २०१९ पासून माहे नोव्हेंबर अखेर बँकामार्फत एकूण ७०८कोटी रु. चे बँक कर्ज वितरण करण्यात आलेले असून उमेद अभियानामार्फत रु. २२.४१ कोटी फिरता निधी व रु. १८ कोटी ७१ लक्ष समुदाय गुंतवणूक निधी वितरण करण्यात आलेआहे.
सन २०२३-२४ मध्ये उमेद अभियानामार्फत बँकामार्फत १८३ कोटी बँक कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आलेले असून त्यापैकी यावर्षी एकूण १५४ कोटी इतके कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, व्हीकेजीबी बँक, दि. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इ. बँकाचा समावेश आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत स्थापन करण्यात आलेल्या व नियमित बैठक, नियमित बचत, अंतर्गत कर्ज व्यवहार, अंतर्गत कर्जाची परतफेड व गटांचे लेखे अद्यावत ठेवणे अशी पंचसूत्री पालन करणा-या गटास गट स्थापन झालेनंतर सहा महिन्यांनी बँक कर्ज वाटप करण्यात येते. यामध्ये गटाला बँकामार्फत बँक कर्जाचा पहिला डोस बचत गटाच्या स्वनिधीच्या ६ पट किंवा रु. १.५ लाख यामध्ये जास्त रक्कम असेल ती, दुसरा डोस बचत गटाच्या स्वनिधीच्या ८ पट किंवा रु. ३ लाख यामध्ये जास्त रक्कम असेल ती, तिसरा डोस बचत गटाने तयार केलेल्या सूक्ष्म गुंतवणूक आराखड्यावर आधारित बँकामार्फत करण्यात येणाऱ्या ग्रेडेशन व पतपुरवठ्याच्या पूर्वीच्या इतिहासावर अवलंबून किमान ६ लाख याप्रमाणे बँक कर्ज वितरीत करण्यात येते. बचत गटांनी पहिल्या डोसचे बँक कर्ज २४ ते ३६ महिन्यांमध्ये, दुसऱ्या डोसचे बँक कर्ज ३६ ते ४८ महिन्यांमध्ये व तिसऱ्या डोसचे बँक कर्ज ६० ते ८४ महिन्यांमध्ये मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणे अपेक्षित आहे.
अभियानामार्फत बँक कर्जासाठी शिफारस करण्यात येणाऱ्या व नियमित बँक कर्ज परतफेड करणा-या बचत गटांना रु. ३ लक्ष पर्यंतच्या बँक कर्जासाठी वार्षिक ७ % इतका व्याजदर बँका आकारतात. तसेच रु. ३ ते ५ लक्ष पर्यंतच्या बचतगटाच्या कर्जावर जास्तीत जास्त वार्षिक १०% आकारण्यात येतो.
उमेद अभियानात समाविष्ट असणाऱ्या गटांना बँकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व बँका तत्काळ वरीलप्रमाणे सवलतीच्या व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणात बँक कर्ज वितरण करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात न अडकता उमेदच्या गटामध्ये समाविष्ट होऊन बँक कर्जाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, जिल्हा परिषद मध्ये संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आवाहन केले आहे.