स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा.दि.१७. गेली आठदहा वर्षे एका गावात राहून ही एकामेकांचे कार्यक्रम बंदी, बोलीचाली तीही कामापुरती अशा परिस्थितीत गावच्या या गेलेल्या तड्याला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सांधण्याचे काम करत अक्षय एकीसाठी एकीवकर सरसावल्याने दुहीची बीजे संपुष्टात आली आहेत.
कास पठारालगत जावली तालुक्यातील एकीव गाव आहे. या गावचे क्षेत्र कास पठारावर सुद्धा असल्याने गावचा कासचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास कार्यकारी समितीत ही एकीव गावचा समावेश आहे. प्रसिद्ध एकीवचा धबधबा ही याच गावात. पण निसर्ग सौंदर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावचा विकास मात्र शून्यच. याच कारण गावात नसलेला समन्वय आणि गटबाजी.
आठ वर्षांपूर्वी काही कारणाने गावात दुफळी सुरू झाली.
काही लोकांच्या महत्त्वाकांक्षामुळे सर्वसामान्य लोक दोन गटात विभागली गेली. कधी कोणाशी भांडणतंटा नसणारे ही गटागटात विभागले गेले. यातून लग्नकार्य वगैरे असेल तर ज्या गटाचा माणूस असेल तो गट सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडत तर विरोधी गटातील लोक फक्त अक्षता टाकण्यासाठी जात.
इतर वैयक्तिक कार्यक्रमात असेच चाले. पण गावचे, देवाचे काही वार्षिक कार्यक्रम असतील तर एका गटाने उत्सव केला तर दुसरा गट सामिल न होता दुसऱ्या दिवशी देवाचे दर्शन घेई. अशा पद्धतीने गावातील सामाजिक एकोपाच नाहीसा झाला होता. यातूनच समन्वयाला धुमारे फुटत काही वैचारिक लोकांच्या पुढाकाराने ही दुही संपवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत या दुहीमुळे काय फायदे झाले. काय तोटे झाले याचा अभ्यास करण्यात आल्यावर असे लक्षात आले की दुहीमुळे गावचेच प्रचंड नुकसान होत आहे. कधी एकामेकांशी भांडण नसणारे ही गटामुळे एकामेकाच्या विरोधात आहे. यातून गावातील सर्व ग्रामस्थ, तरूण मंडळ यांनी एकत्रीत येत गावची मिटींग घेतली. यामध्ये गटबाजीला प्रोत्साहन देणारे काही लोक आढळल्यास त्यांच्यावर सर्वानुमते कारवाई करण्याचे ठरवत आठ वर्षांपासून असलेली गटबाजी संपवून टाकण्यात आली.
यापुढे गावचे रजिस्टर असणारे ग्रामस्थ मंडळ स्थापन करून या मंडळाच्या माध्यमातून गावचा कारभार एकमताने करण्याचे ही ठरवण्यात आले. एकीव गावच्या या निर्णयाने छोट्याशा गावातील दुफळी संपुष्टात येवून गाव समाधानाने एकत्र नांदणार आहे.
गावातील गटबाजी संपल्याने गावचा विकास होण्यास मदत होणार असून आमच्या गावाप्रमाणे ज्या गावात अशी गटबाजी आहे त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की अशी गटबाजी बंद करा. आमच्या गावाप्रमाणे आपणही एकत्र या. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी गावचा बळी देवू नका.
प्रतिक्रिया — बजरंग कदम,एकीव ग्रामस्थ.