स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.सातारा मेढा महाबळेश्वर रोडवर भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्टकार व मोटारसायकल या दोन वाहनांच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू व एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज शुक्रवारी दि.२८.रोजी सकाळी आठच्या सुमारास आंबेघर गावच्या हद्दीत घडला.अपघाताची माहिती मिळताच मेढा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ अपघातस्थळी पोहोचले.
याबाबत घटना स्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोशी गावचे युवक प्रविण कोडींबा कासुर्डे (वय ४०) हे आपल्या लुना टीव्हीएस मोटार सायकल (क्रमांक एम एस – ११४ ५२८३) वरून दूध घालण्यासाठी मेढा येथे चालले होते.त्यांची गाडी आंबेघर तर्फ मेढा गावच्या बस स्टॉपच्या पुढील बाजूस भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट (क्रमांक एम एच ४३ एल – ३७५०) या कारने जोरदार धडक दिली.यावेळी दुचाकीवरील प्रविण कोंडीबा कासुर्डे वय(४०) याचा जागीच मृत्यू झाला.त्याच्या मागे बसलेला सिद्धांत संतोष कदम (वय १७) मोटारसायकल वर मागे बसून मेढा येथे कॉलेजला चालला होता,सिद्धार्थ हा गंभीर जखमी झाला पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आला आहे.या घटनेची नोंद मेढा पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सपोनि संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बेसके हे करत आहेत.
सातारा मेढा महाबळेश्वर रोडवर अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून ठीक ठिकाणी फलक लावणे,रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे काढणे तसेच अपघातजन्य ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे असे अपघात झालेल्या ठिकाणी नागरिकांमध्ये बोलले जात होते .