
स्टार ११ महाराष्ट्र ——
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रांचा धडाका आजपासून सुरु झाला. सकाळी गारेच्या गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत भाजपसह, महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व आजी- माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
मंगळवारी सकाळी गारेचा गणपतीची विधिवत पूजाअर्चा करून शिवेंद्रराजेनी गणपतीचे दर्शन घेतले आणि पदयात्रेला सुरुवात झाली. वाजतगाजत निघालेली पदयात्रा गारेचा गणपती, कारंडबी नाका, मोरे कॉलनी, कृष्णेश्वर पार्क, गोखले हौद, न्हावी आळी, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदिर ते सुरुची या मार्गावरून काढण्यात आली. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता – भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
बुधवार दि. ६ रोजी सकाळी ७ वाजता अदालतवाडा, वाघाची नळी, पटवर्धन बोळ, कमानी हौद, कूपर कारखाना ते नगरपालिका शाहू चौक अशी पदयात्रा होणार आहे तसेच सायंकाळी ६.३० वाजता गुरवार परज आणि रात्री ८ वाजता एस. टी. कॉलनी मैदान शाहूनगर येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारकरांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी आगामी काळात उपाययोजना केल्या जातील. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. महायुती सरकारच्या साथीमुळे संपूर्ण सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. विकासासाठी महायुती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सातारकरांनी महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपल्या शहराचा विकास अखंडित ठेवण्यासाठी साथ द्यावी. विक्रमी मताधिक्य देऊन मला विजयी करा आणि आपल्या सातारकरांची ताकद विरोधकांना दाखवून द्या, असे आवाहन शिवेंद्रजेंनी केले.