
स्टार ११ महाराष्ट्र
प्रतिनिधी — अक्षय गोरे
बामणोली दि.०४: महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले अजित सपकाळ यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्याची चर्चा रंगू लागली आहे.
महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झंझावात आता निवडणुकीच्या मैदानात दिसू लागला आहे. तळदेव गटातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अजित सपकाळ यांच्या राजकारणाला ग्राउंडसह हायटेक प्रचाराची जोड मिळाल्याचे चित्र आहे. घरोघरी भेटी, प्रचार फेऱ्या आणि कोपरा सभा सुरू असतानाच समाज माध्यमांवर त्यांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. त्यामुळे तळदेव गटात धनुष्यबाण सुसाट सुटल्याचे दिसत आहे.
महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा आणि भावी अजेंडा डिजिटल स्वरूपात मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
अजित सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचे रिपोर्ट कार्डच जनतेसमोर ठेवले आहे. यामध्ये १०५ गावांसह महाबळेश्वर-तापोळा-खेड परिसरातील गावागावांमधील कोट्यावधी रुपयांची रस्ते विकासकामे, कोयना जलाशयावरील केबल स्टे ब्रिज, नवीन महाबळेश्वर प्रकल्प, उत्तरेश्वर मंदिर विकास कार्यक्रम, तापोळ्यासारख्या १०५ गावच्या बाजारपेठेत होत असलेले अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल असे अनेक प्रकल्प मार्गी लावल्यामुळे किंबहुना तालुक्यात विकासकामांची गंगा वाहत असल्यामुळे अजित सपकाळ यांना गावागावांमधून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. तापोळा, कांदाटी, वाडा-कुंभरोशी सह संपूर्ण गटातील गावांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन मी नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणार आहे. तुमच्या हक्काचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी व विकासाचे आणखी एक नवे पर्व उभे करण्यासाठी मला साथ द्या. अजित दादा सपकाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गावोगावी प्रत्यक्ष काम करत सर्वसामान्य नागरिकांच्या व गोरगरिबांच्या अडचणी सोडवल्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे .
विशेष म्हणजे या निवडणुकीत महिला शक्तीनेही शिवसेनेला मोठे बळ दिले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू अशा या कार्यकर्त्यासाठी तळदेव गटातील गावागावांमध्ये लाडक्या बहिणींनीही स्वतः शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यावेळी महाबळेश्वरमध्ये भगवा फडकणारच असा संदेशच जणू काही या भगिनी देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे विकासकामांची गंगा आणि दुसरीकडे गावागावातील कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे अजित सपकाळ यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या दुहेरी लढतीत घड्याळाचे बारा वाजणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



