स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——अजित जगताप सातारा
सातारा दि.२२. बेडग ता. मिरज जिल्हा सांगली येथील गावात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडण्यात आली. याचा मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी निषेध नोंदवला होता. त्याबाबत कारवाई न झाल्याने अखेर दिनांक १२ सप्टेंबर पासून बेडग ते मंत्रालय या लॉंग मार्च काढण्यात आला. सातारा हद्दीमध्ये सात आंदोलकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .परंतु, या ठिकाणी रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन कर्ते महेश कुमार कांबळे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड व मान्यवरांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जर या ठिकाणी उपचार होत नसतील तर आम्ही आमच्या आंदोलकांना खाजगी दवाखान्यात दाखल करतो. याबाबत सातारा शासकीय रुग्णालय प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
वास्तविक पाहता सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहात सुमारे दोन तास सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दया निधी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडभिसे तसेच आंदोलक यांच्याशी सविस्तर चर्चा झाली .परंतु ,त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. याच कालावधीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा हद्दीतील वाडे फाटा या ठिकाणी याच प्रश्नाबाबत रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोलमडून पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु या आंदोलनांमध्ये पायी चालत येणारे आंदोलक अर्चना कांबळे, सरिता कांबळे, कल्पना कांबळे, दीक्षा कांबळे, अंजना भोसले, अमृता कांबळे, सुजाता कांबळे यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांना फक्त एक सलाईन लावण्यात आले परंतु कोणतेही तातडीची उपाययोजना झाली नाही. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. अखेर सांगली जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन आजारी आंदोलकांची चौकशी केली. वास्तविक सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस यंत्रणा यांचे सहकार्य अपेक्षित होते परंतु या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे प्रशासन व पोलीस यंत्रणा रुग्णालयात धावून आली. त्यानंतर आंदोलन रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करावे अशी सूचना करण्यात आली.