स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
सातारा. दि. २१.जिल्हा नियोजन व विकास समिती यांच्याकडून जिल्हा पोलीस दलासाठी साधनसामुग्री व वाहने हस्तांतरण, जिल्हाधिकारी कार्यालय येथील पोलीस चौकीचे उद्घाटन, ग्राम सुरक्षा यंत्रणा शुभारंभ असे कार्यक्रम पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे झाले.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासन पोलीस दल अद्ययावत करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करुन देत आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदलत असून 112 या क्रमांकाला प्रतिसाद कालावधी 7 ते 8 मिनीटांवर आला आहे. पोलीस दल अत्यंत कार्यक्षम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना समाजात कोणतीही तेढ निर्माण न होऊ देता जिल्हा पोलीस दलाने कौशल्याने स्थिती हाताळली. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना जिल्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय चांगली आहे, असे कौतुक करुन त्यांनी ग्राम सुरक्षा दल उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या.
ग्रामसुरक्षा यंत्रणा – या यंत्रणेद्वारे पूर परिस्थिती, आगीची घटना, नैसर्गिक आपत्ती तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याबाबतची माहिती एकाचवेळी सर्व नागरीकांना देता येईल तसेच चोरी, दरोडा या संदर्भात माहिती तात्काळ सर्व नागरीकांना देवून सावध करता येईल त्यामुळे गुन्हे उघडकीचे प्रमाण वाढेल तसेच विविध सामाजिक संदेश प्रत्येक नागरीकांपर्यंत दिले जावून त्याद्वारे जनजागृती होईल. याद्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी संदेश देण्याची व्यवस्था जिल्हास्तरावरून देखील करता येईल.या यंत्रणेचे प्रात्यक्षिक डी.के. गोर्डे यांनी यावेळी उपस्थितांना करुन दाखविले.