सातारासामाजिक

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेला साडे आठ कोटींचा नफा ; 51 वी वार्षिक सभा खेळीमेळीत

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–

मेढा.दि.२८. स्पर्धेच्या युगातही जावळीसारख्या ग्रामीण भागातील बँकेने मुंबईसारख्या शहरात स्वतःचे स्थान निर्माण करून ग्राहक व सभासदांना अविरत व तत्पर सेवा दिल्याने जावली बँकेची विश्वासार्हता आजही टिकून आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात आपले स्थान टिकवून कोरोना काळानंतर सलग तीन वर्षे तोट्यात असणाऱ्या बँकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आपली भरारी घेऊन यंदाच्या वर्षात साडेआठ कोटींचा नफा प्राप्त केला आहे. यानिमित्ताने सभासद व ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत विधान परिषदेचे आमदार व बँकेचे मार्गदर्शक शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मांकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जावळी बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी, माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर यांच्यासह मान्यवर व संचालक मंडळ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, “कोरोनानंतर बँक अडचणीत आली होती. मात्र, योग्य व अनुभवी संचालकांच्या हातात बँकेची सूत्रे असल्याने आर्थिक संकटातून बँक बाहेर आली.” या पुढील सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहनही आमदार शिंदे यांनी यावेळी केले. सदाशिव सपकाळ म्हणाले, “सभासदांनी संचालक मंडळावर जो विश्वास दाखविला, तो बँकेला पुन्हा नफ्यात आणून सार्थ ठरवून दाखवला.”

वसंतराव मानकुमरे म्हणाले बँकेच्या मुख्य शाखेची जागा बदलावी.” बँकेच्या विस्तारीकरणाचा विचार करून तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे म्हणाले, “बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.” यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. वसंत तरडे यांनी सूत्रसंचालन केले. ईश्वरदास ललवाणी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!