
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा.दि.०२.जावळी तालुक्यातील केंजळ गावचे सुपुत्र,भारतीय सैन्य दलाचे जवान श्री विशाल दत्तात्रय केंजळे हे गेली ११ वर्षे भारतीय सैन्यदलाच्या फाईव्ह मराठा या युनिटमध्ये कार्यरत होते.२०२१ साली त्यांचा विवाह झाला असून त्यांना २ वर्षाची एक मुलगी आहे.सध्या ते आयोध्या याठिकाणी कार्यरत होते. चार-पाच दिवसापूर्वीच ते रजेवर आले होते.शुक्रवार दि.२८ रोजी रात्रौ ९ वाजता कोंडवे येथिल एक घरगुती कार्यक्रम आटोपून आपल्या सोबत दोन लहान भाच्यांना घेवून ज्युपिटरवरून घराकडे निघाले होते.हमदाजजवळ पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने विशाल केंजळे गाडीवरून रस्त्यावर आपटले.या अपघातात सोबत असलेली दोन्ही मुले मात्र धडक देणार्या गाडीच्या काचेवर उडाल्याने त्यांना जास्त दुखापत झाली नाही. प्रत्यक्षदर्शी व आवाजाने जमलेल्या लोकांनी विशाल केंजळे यांना तातडीने सातारला हाॅस्पिटलला हलविले.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने त्यांना पूणे येथिल मिलिट्रिच्या कमांड हाॅस्पिटलला हलविण्यात आले.
पूणे येथे घेवून गेलेल्या जवान विशाल केंजळे यांचेवर उपचार सुरू झाले पण त्यांच्या शरीराने प्रतिसाद न दिल्याने अखेर शनिवार दि.२९ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.विशाल गेल्याची बातमी त्यांच्या केंजळ गावापर्यंत पोहचली आणि आख्खा गाव शोकसागरात बुडाला.रविवार ३० जुन रोजी सायंकाळी ७ वाजता जवान विशाल केंजळे यांचे पार्थिव घेवून सैन्यदलातील जवान व वडील दत्तात्रय केंजळे, जीवलग मित्र ओंकार मोहळकर हे केंजळ येथे आले.जावळी तालुक्यातून जमलेला जनसमुदाय भरपावसात भिजत,अमर रहे, अमर रहे विशाल केंजळे अमर रहे,भारत माता की जय अशा घोषणा देत होते.पार्थिव घरात नेताच आई,पत्नी,बहिणी व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा,केलेला आक्रोश भयंकर होता. थोड्यावेळानंतर पार्थिव केंजळाई देवीच्या मंदिरा समोरील प्रांगणात ठेवण्यात आले.
या ठिकाणी मा.आ. सदाशिव सपकाळ,मा.जि.प.सदस्य दिपक पवार,मचिंद्र क्षिरसागर, विलासबाबा जवळ,अजिंक्यतारा सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन नामदेव सावंत,सरपंच परिदेचे अरूण कापसे,सरपंच संतोष केंजळे इ.मान्यवरांसह विभागिय पोलिस अधिकारी,पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस दल व सैन्य दलाच्या वतीने याठिकाणी मानवंदना देण्यात आली. तालुक्यातुन आलेल्या जनसमुदायाने व केंजळ गावातील ग्रामस्थ,महिला,युवक यांनी या ठिकाणी पार्थिवाचे दर्शन घेतले.सजवलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीमधून पार्थिक वेण्णातिरावर केंजळ येथिल स्मशानभूमीत नेण्यात आले.या ठिकाणी त्यांच्यावर रात्री ८-३० वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
विशाल हे अत्यंत शांत,संयमी व मितभाषी होते.त्यांचा मोठा मित्र परिवार होता. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावरच अवलंबून होती.आई-वडीलांचा आधारच संपला.तर पत्नी व मुलगी पोरकी झाली आहेत.