
स्टार ११ महाराष्ट्र
मेढा.दि.०३. मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अद्यापही ८०% पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, प्रशासनाने तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा,अशी मागणी “आम्ही जावळीकर” चळवळीच्या वतीने मा.तहसिलदार जावळी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदनाच्या प्रती मा.श्रीमंत छ.ना.शिवेंद्रराजे भोसले,मा.जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आल्या आहेत.

जावळी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन वेळेआधी मे महिन्याच्या मध्यंतरीच झाले.सलग पडणार्या पावसामुळे शेतीची मशागतही यावर्षी शेतकरीवर्गाला करता आलेली नाही.मशागतच झाली नसल्याने व सततच्या पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने अद्यापही पेरण्या करता आलेल्या नाहीत. विशेषतः मोरावळे ते बोंडारवाडी,धनकवडी ते भामघर आणि कोयना व करहर विभागातील अनेक गावात यावर्षी कडधान्ये, भुईमूग, सोयाबीन आणि भात पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत.

शेतकर्यांनी भाताचे तरवे टाकले पण २०% शेतकर्यांची रोपे अल्प प्रमाणात उगवलीआहेत तर ८०% भाताचे बी कुजुन गेल्याने भात लावणी वाचून शेती पडून रहाणार असल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत.अनेक शेतकर्यांनी बियाणे खरेदी व खते यांची खरेदी उसनवारी व उधारीवर केली पण पावसाने ती वाया गेली त्यामुळे शेतकर्यांच्या समोर अस्मानी संकट उभे राहिले आहे.जावळी तालुक्याची भौगोलीक रचना पहाता महाबळेश्वरच्या जवळ असलेल्या डोंगर रांगातील या गावात नेहमीच पावसाचे प्रमाण अधिक असते.
पण यावर्षी मात्र मे महिन्यापासून सलग पडणार्या पाऊसामुळे अद्यापही पेरण्या झाल्या नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे.पूर आला,अतिवृष्टी झाली शेतीचे नुकसान झाले तर पंचनामे होतात.पण यावर्षी संततधार पाऊसामुळे पेरण्याच झालेल्या नाहीत त्यामुळे वरील निकष न पहाता तहसिलदार सो. यांनी महसुल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकार्यांमार्फत या विभागील प्रत्येक गावातील शेतकर्याच्या बांधावर जावून प्रत्यक्ष स्थळपहाणी करून सरकारकडे याचा तातडीने अहवाल पाठवावा असे आवाहन प्रत्यक्ष भेटून आम्ही जावळीकर चळवळीच्या माध्यमातून विलासबाबा जवळ,राजेंद्र जाधव, शांताराम कदम,सुरेश पार्टे,भास्कर धनावडे,मारूती चिकणे,सचिन करंजेकर, अरूण जवळ,प्रकाश सुतार,सुरेश कदम,आनंदा परिहार,शरद देशमुख यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

सततच्या पावसाने यावर्षी पूर्ण खरीपाचा हंगामच वाया गेला असून कडधान्य सोयाबीन विकून शेतकरी वर्ग दिवाळीचा सण साजरा करीत असतो पण या वर्षी सरकारने मदत केली नाही तर शेतकर्यांना दिवाळी ऐवजी शिमगा करण्याची वेळ येणार असल्याने सरकारने गांभिर्यपूर्वक विचार करून शेतकर्यांना त्वरीत मदत करावी ही विनंती.