मेढ्याच्या टाऊन प्लॅन सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविणार

मेढा टाऊन प्लॅन सुधारणांसाठी नगर नियोजन तज्ज्ञांची मदत मिळणार पुण्यातील बैठकीत निर्णय
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क……
मेढा.दि.१३.नगर रचना विभागाने तयार केलेल्या टाऊन प्लॅन मध्ये अनेक त्रुटी असल्याने मेढा नगरपंचायत ता.जावळी,जि.सातारा या तालुक्याच्या गावाचा टाऊन प्लॅन सुधारणांसाठी नगर नियोजन तज्ज्ञांची मदत मिळणार आहे. या सुधारणांसाठी आणि मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविण्यासाठी ‘मेढा रहिवाशी शेतकरी बचाव संघ’ हा अराजकीय संघ स्थापन करण्यात आला असून या द्वारे मेढ्याच्या रहिवाशांना या आराखड्यातील त्रुटी लक्षात आणून देणे आणि टाऊन प्लॅन चा सुधारित आराखडा करण्यास शासनाला भाग पाडण्यात येणार आहे.

देशातील एक प्रसिद्ध नगर नियोजन तज्ज्ञ आणि पुण्याच्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज’ संस्थेच्या प्रमुख अनिता गोखले -बेनिंजर यांनी या सर्व नियोजन प्रक्रियेत, लोकलढ्यात सक्रिय मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे.मूळचे मेढ्यातील रहिवाशी आणि पुण्याच्या पत्रकारितेतील ‘प्रबोधन माध्यम न्यूज’ संस्थेचे प्रमुख डॉ.दीपक बीडकर यांच्या पुढाकाराने ही बैठक आज डेक्कन जिमखाना,पुणे येथे झाली. नगर नियोजन तज्ज्ञ अनिता गोखले-बेनिंजर, डॉ.दीपक बीडकर,मेढ्याच्या टाऊन प्लॅन वर हरकत घेणारे आणि लढा देणाऱ्यांचे प्रतिनिधी विलासबाबा जवळ,पत्रकार सुरेश पार्टे, सचिन जवळ, विनायक तोडकर,राम मोरे, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज’ संस्थेचे आर्किटेक्ट प्रतिनिधी इत्यादी या बैठकीला उपस्थित होते.

पुण्याच्या विकास आराखड्यात सुधारणांसाठी कसा लढा द्यावा लागला याची माहिती अनिता गोखले-बेनिंजर यांनी दिली. त्या म्हणाल्या,’आपण राहत असलेल्या गावाचा चांगला आराखडा शासनाकडून करवून घेणे आणि त्यात नागरी सुविधांचा अंतर्भाव करणे ही शास्त्रीय आणि शासकीय प्रक्रिया असली तरी त्यात लोकसहभाग असणे आवश्यक आहे. नागरिकांना अंधारात ठेवून चांगला नगर नियोजन आराखडा बनणे शक्य नसते. टाऊन प्लान रोखता येत नाही,पण सुधारुन घेता येतो. त्यासाठी मेढ्याच्या रहिवाशांनी प्रस्तावित टाऊन प्लॅनवर मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविल्या पाहिजेत. एक्झिस्टिंग लँड युज आराखडा (ई एल यु) मध्ये त्रुटी दिसत आहेत,त्यामुळे प्रपोज्ड लँड युज आराखड्यात देखील गंभीर त्रुटी निर्माण झाल्या आहेत.

सिटी सर्व्हे देखील त्या एक्झिस्टिंग लँड युज आराखडा मध्ये दिसला पाहिजे. जमिनीची प्रतवारी कळली पाहिजे.कंटूर सर्व्हे झाला असेल तर तो रहिवाशांना मिळायला हवा. ज्यांच्या जमिनी आरक्षणात जात आहेत,त्यांना प्रचलित बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळायला हवा. रहिवाशांना विश्वासात घेऊन सुधारित आराखडा बनला पाहिजे आणि त्यात पिण्याचे पाणी,बंदिस्त गटार योजना, कचरा व्यवस्थापन सुविधा या आगामी ३० वर्षांच्या वाढीचा विचार करून प्रस्तावित केल्या पाहिजेत.प्रारूप विकास आराखडा मराठीतून मिळणे देखील रहिवाशांसाठी आवश्यक आहे’.
विलासबाबा जवळ,पत्रकार सुरेश पार्टे,सचिन जवळ, विनायक तोडकर,राम मोरे यांनी प्रस्तावित टाऊन प्लॅन चे नकाशे,नोटीस आणि शासकीय कागदपत्रे अनिता गोखले-बेनिंजर यांना दाखवली. आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणल्या. मेढ्यातील रहिवाशांच्या समस्या मांडल्या आणि मूठभर लोकांच्या हितासाठी व गरीबांना उध्वस्थ करण्यासारखे टाऊन प्लॅन चे नियोजन झाल्याचे निदर्शनास आणले.दिवाळी पूर्वी टाऊन प्लॅन नोटीस देऊन नागरिकांच्या हरकती नोंदविण्यास ,शंका समाधान करण्यास एकही अधिकारी जागेवर नसल्याने कमी कालावधी मिळण्यास प्रशासन जबाबदार असून हरकती नोंदविण्यास महिनाभर मुदत वाढवून घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तरीही सर्व बाधित रहिवाशी व शेतकर्यांनी १७ नोव्हेंबर पुर्वी
व्यक्तीगत व सामुहीक मोठ्या प्रमाणावर प्राथमिक आणि वैयक्तिक हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच मेढा येथे बैठक आणि कार्यशाळा मेढ्याच्या नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी आणि त्यावर नगरनियोजनाच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यासाठी'सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज'संस्थेच्या आणि 'मेढा रहिवाशी, शेतकरी बचाव संघाचे' वतीने लवकरच ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार असून त्यात प्रबोधनात्मक कार्यशाळा घेण्यात येणार आहे.या कार्यशाळेत नगर नियोजन तज्ज्ञ अनिता गोखले-बेनिंजर उपस्थित राहणारआहेत.



