सामाजिक

मेढ्यात रंगणार नामदार छत्रपती महादहीहंडीचा थरार!अभिनेत्री राजेश्वरी खरात ठरणार प्रमुख आकर्षण

स्टार ११महाराष्ट्र

मेढा.दि.०४. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाला अधिक रंगत आणण्यासाठी मेढा, ता.जावली येथे ७ सप्टेंबर २०२६ रोजी नामदार छत्रपती महादहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

या महादहीहंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पुरुष गोविंदा पथकासाठी प्रथम क्रमांकाचे तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच महिला गोविंदा पथकासाठी प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्रमांकांच्या पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, विजेत्या पथकांना एकूण ५लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे देण्यात येणारआहेत. मेढ्यासह संपूर्ण जावली तालुक्यात दहीहंडी उत्सवाची उत्सुकता वाढली आहे.

मेढा येथे होणाऱ्या या भव्य दहीहंडी सोहळ्यात सातारा जिल्ह्यासह विविध भागांतून गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये रंगणारी चुरस, गोविंदांचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांचा जल्लोष यामुळे मेढ्यात उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.

दहीहंडी सोहळ्याला मनोरंजनाचीही मोठी मेजवानी मिळणार आहे. ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. त्याचबरोबर लोकप्रिय अभिनेत्री रिल स्टार गाऊ खुडे यांच्या धमाल गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याच्या थरारासोबतच उपस्थितांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी जावली तालुका व मेढा शहरातील भाजपचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य महादहीहंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महादहीहंडीमुळे मेढा शहरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!