संकटाच्या काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच आधार… संचालक ज्ञानदेव रांजणे


केळघर. दि.१९. शेतकरी असो अथवा सामान्य खातेदार त्याच्या प्रत्येक अडचणीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कायम आधार देत आली असून जिल्हा बँकेच्या विमा योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा गांजे येथील खातेदार भरत यदू शेलार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास PMSBY योजनेचे माध्यमातून विमा हप्ता रूपये वीसचे नुतनीकरण वेळेत केले, यामुळे भरत शेलार यांचे निधनानंतर त्यांचे वारसदार श्रीमती कविता भरत शेलार यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ म्हणून दोन लाख रुपये विमा रक्कम प्रदान करताना ते बोलत होते. वारसदार कविता शेलार यांना सदरची रक्कम करताना बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे हस्ते वितरीत करण्यात आली.

याप्रसंगी विभागीय विकास अधिकारी अण्णासाहेब फरांदे, तालुका विक्री अधिकारी संजय निकम, शाखा विकास अधिकारी दत्तात्रय दुर्गावळे शाखाप्रमुख दिपक पार्टे,गांजे ग्रामपंचायत सरपंच सौ. लक्ष्मी चिकणे, जेष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, तुकाराम जुनघरे, सागर धनावडे, सुभाष शेलार, मारूती चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

ही रक्कम वारसांना मिळवून देण्यासाठी बॅंकेचे कर्मचारी व मुख्य कार्यालय येथील अधिकारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे रक्कम त्वरित उपलब्ध होऊ शकली. जिल्हा बँकेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.



