पर्यटन

वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

स्टार ११महाराष्ट्र

मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.

मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीरजीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, या मुळे किल्ले प्रतापगड हेकेवळ ऐतिहासिक स्थळ न राहता शिवकालीन वारसा पर्यटन क्षेत्रातील एक महत्वपूर्ण आकर्षण म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

किल्ले प्रतापगड येथील वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची गाथा राज्यातली तमाम शिवप्रेमींना अखंड प्रेरणेचा स्त्रोत ठरणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई म्हणाले.या निर्णयामुळे इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, विविध नागरिक, संघटना, संशोधक, अभ्यासक यांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!