बोंडारवाडी धरणा संदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक मा.आ.दगडुदादा यांचा पुढाकार,ठोस निर्णय होण्याची शक्यता

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मेढा. दि.१२ जावली तालुक्यातील ५४ गावांना वरदान ठरणारा शेती व शेतीपूरक व्यवसायातून वीस ते पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा नियोजित बोंडारवाडी धरण प्रकल्प गेली अनेक वर्षे आंदोलने होऊनी रखडला असून आता याबाबत जावली तालुक्याचे सुपुत्र लालबाग-परळ चे माजी आमदार शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सकपाळ यांनी पुढाकार घेतला असून जलसंपदा राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील दालनात मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता आमदार बच्चू कडू, बोंडारवाडी धरण कृती समिती व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमुळे बोंडारवाडी धरणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
जावली तालुक्यातील मेढा विभागातील ५४ गावाना शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने बोंडारवाडी धरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून गेली अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला आहे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विजयराव मोकाशी यांनी बोंडारवाडी धरण कृती समितीची निर्मिती केली या समितीच्या माध्यमातून धरणासाठी अनेक आंदोलने केली बैठका घेतल्या मात्र अद्याप धरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही शेवटी भारत पाटणकर यांच्याकडे बोंडारवाडी धरणाचा निर्णय सोपविण्यात आला सध्या त्यांच्या माध्यमातून धरण होण्यासाठी समितीचा सरकार दरबारी संघर्ष सुरू आहे येत्या २३ तारखेला सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान जावली तालुक्याचे सुपुत्र व लालबाग-परळचे माजी आमदार व शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सकपाळ यांनी बोंडारवाडी धरणाबाबत पुढाकार घेतला असून राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्याशी पत्रव्यवहार करून बोंडारवाडी धरण जावली तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या धरणामुळे या दुर्गम आणि डोंगराळ भागातील जनतेला रोजगार उपलब्ध होणार आहे शेतीला पाणी मिळणार आहे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळणार आहे तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक असल्याचे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले आहे
माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या मागणीवरून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी दहा वाजता मंत्रालयात बोंडारवाडी धरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे या बैठकीला स्वतः आमदार बच्चू कडू , बोंडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य ,त्याचप्रमाणे जलसंपदा विभागाचे सचिव ,उपसचिव , कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक , जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता , सिंचन मंडळा साताराचे अधीक्षक अभियंता आदी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे ना बच्चू कडू हे शिवसेनेचे सहयोगी मंत्री असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोंडारवाडी धरणाबाबत आग्रह धरू शकतात म्हणून या बैठकीत बोंडारवाडी धरणा संदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.



