स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-
सातारा.दि.२७.हिवरे ता. कोरेगाव गावचे हद्दीत कुंभारकी नावाचे शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय वर्ष 12 या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून करून मृतदेह उसाच्या शेतात पाचटीने झाकून ठेवलेल्या अवस्थेत सापडला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
सदरची घटना ही अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने सातारा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख व श्रीमती आंचल दलाल (अपर पोलीस अधीक्षक सातारा) यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके,अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा सातारा व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना आरोपी पकडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे,पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे,पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते.याच बरोबर वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिलेले होते.
हिवरे,ता.कोरेगाव, जिल्हा सातारा या भाडळे खोऱ्यातील छोट्याशा गावात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व वाठार पोलीस ठाण्याचे पथक नेमण्यात आलेले होते. सदरचे पथक मयत मुलाच्या खुना संदर्भात माहिती घेत होते.सर्व शक्यतांचा अभ्यास करून खून कोणी केला असेल याबाबत माहिती घेत होते.
मा.पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती.मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून व तेथील जवळपासचे साक्षीदार यांच्याकडे केलेल्या विचारपूस व चौकशीवरून सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनीच केला असावा असा दाट संशय पोलिसांना आलेला होता. पोलीस स्थानिक परिसरात चौकशी करत असताना लोकांच्या माहितीवरून आणि मुलाच्या वडिलांच्या माहितीमध्ये तफावत आढळून येत होती.त्यामुळे सदर गुन्हा हा त्याच्या वडिलांनीच केला असेल असा दाट संशय पोलिसांना आलेला होता. मुलाच्या वडिलांना विश्वासात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदरचा खून हा त्यानेच केले असल्याचे कबूल केले.
स्वतःच्या मुलाचा खून करण्याचे कारण विचारता आरोपीने त्याला कॅन्सर असल्याचा संशय होता व त्याचे मृत्यू पश्यात आपल्या मुलाचे कसे होईल, त्याचा कोण सांभाळ करील, त्यालाही कॅन्सर होईल, त्याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा रस्सीने गळा आवळून खून केला असलेबाबत कबुली दिली आहे.
अतिशय संवेदनशील आणि आव्हानात्मक अशा या गुन्ह्यामध्ये अवघ्या 48 तासात स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलीस ठाणे यांच्याकडून आरोपी जेरबंद करून पोलिसांनी आपली कार्यतत्परता दाखवून दिली. या कामी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी ग्राम सुरक्षा दलाचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यांच्या सहकार्यानेच या गुन्ह्यामध्ये आरोपी पर्यंत पोहोचण्यास आणि गुन्ह्याची उकल लवकर करण्यास मदत झाली असे सांगून ग्राम सुरक्षा दलाचे महत्व यानिमित्ताने दाखवून दिले.आव्हानात्मक आणि संवेदनशील अशा या गुन्ह्यात सहभागी सर्व पोलीस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.