स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा दि २०. मेढा येथील अग्रमानांकित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आणि वाई येथील पर्फेक्ट इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात आज विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी सहकार्याचा करार करण्यात आला. या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेजर अशोक गिरी सर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख श्री. पी. डी. पाटील आणि पर्फेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. आर. व्ही. ढेकले यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या कराराअंतर्गत दोन्ही संस्था विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक अनुभव देण्यासाठी विविध उपक्रम राबवतील. यामध्ये:इंडस्ट्रियल विजिट्स: पर्फेक्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादन युनिटला विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट घडवून आणणे.इंटर्नशिप्स: इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्सची संधी उपलब्ध करून देणे.गेस्ट लेक्चर्स: पर्फेक्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या तज्ज्ञांकडून महाविद्यालयात व्याख्याने आयोजित करणे.जॉइंट प्रोजेक्ट्स:उद्योगाला लागू असणाऱ्या प्रकल्पांवर विद्यार्थी आणि कंपनीच्या तज्ज्ञांचे संयुक्त संशोधन.कौशल्य विकास कार्यशाळा:विद्यार्थ्यांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
या करारावरून प्रसन्नता व्यक्त करताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी सर म्हणाले, “या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक आणि व्यावसायिक ज्ञानाचा उत्तम मेळ घालता येईल. त्यामुळे त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यास आणि भविष्याची उज्वल कारकीर्द घडविण्यास निश्चितच मदत होईल. जावळी सारख्या दुर्गम परिसरातील गोरगरीब शेतमजूर माथाडी कामगारांच्या मुलांच्या जीवनात विविध कौशल्य वृद्धिंगत करून रोजगारक्षम व कुशल मनुष्यबळ निर्मिती साठी टाकलेले आजचे पाऊल निश्चितच मैलाचा दगड म्हणून भविष्यात गौरवानी उल्लेख होईल असा विश्वास वाटतो.”
डॉ. ढेकले यांनीही या सहकार्याचे स्वागत केले आणि म्हणाले, “विद्यार्थ्यांना उद्योगाचा अनुभव देणे आणि भविष्यातील हुशार होतकरू व ज्ञानाधिष्ठित कुशल रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
या कराराच्या निमित्ताने महाविद्यालय आणि पर्फेक्ट इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात दीर्घकालीन आणि फायदेशीर सहकार्याला पाऊल पडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भारतीय उद्योगांच्या विकासासाठी मोलाची भर पडणार हे निश्चित.या करारासाठी माननीय उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य मिळाले.