
केळघर.दि.०३ जावली तालुक्यातील ५४ गावाचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला सोडविण्यासाठी आज बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने केळघर येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बोंडारवाडी धरण निर्मितीसाठी बोंडारवाडी कृती समिती व श्रमिक मुक्ती दल गेले अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत परंतु प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रकल्प प्रलंबित आहे.बोंडारवाडी धरणाच्या मंजुरीसाठी डॉ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शाखाली कै. विजयराव मोकाशी यांनी शासनाकडे कागदपत्रांद्वारे वारंवार पाठपुरावा करून देखील अजूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ५४ गावात प्रचंड नाराजी आहे.५४गावातील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते,तर येथिल शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.अश्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे.
ही समस्या कायमची सोडविण्यासाठी कै.विजयराव मोकाशी यांनी ५४गावाच्या नागरिकांना एकत्र आणले. बोंडारवाडी धरण निर्मितीसाठी गेली अनेक वर्षापासून हा लढा सुरू केला आहे.बोंडारवाडी धरणाच्या मंजुरीला लवकरात लवकर परवानगी मिळावी या साठी आज ५४ गावातील नागरिकांना बोंडारवाडी कृती समितीच्या वतीने या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.
या मेळाव्याला श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ भारत पाटणकर,आ. शिवेद्रसिंहराजे भोसले तालुक्यातील विविध पक्षांचे मान्यवर यांच्यासह ५४गावातील नागरिक महिला तसेच मुंबई पुणेकर उपस्थित राहणार आहेत.



