स्टार ११ महाराष्ट्र प्रतिनिधी ——- (अजित जगताप)
सातारा दि:२६. मोठ्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर गणरायाच्या आगमनाच्या नंतर साताऱ्यात अचानक पावसाने दुपारी दमदार हजेरी लावली. त्यामुळे, साताऱ्यात पावसाची रिपरिप पण नवीन प्रशासन इमारत झाले ओलेचिक याचा पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी व अभ्यागतांना अनुभव घ्यावा लागला.
याबाबत माहिती अशी की, सप्टेंबर महिना संपत आला तरी पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक जण कासावीस झाले होते. प्रत्येक जण पावसाच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारी अचानक दुपारी ढगाळ वातावरणानंतर अक्षरशा मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे खऱ्या अर्थाने यंदाचा पाऊस अनुभवण्यास मिळाला. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखावला असला तरी गणरायाचे देखावे व सजावट व बाजारपेठेमध्ये पावसाने चांगलेच थैमान घातले होते .
अनेकांनी नेहमीप्रमाणे घरी छत्री व रेनकोट ठेवून आले होते .त्यांना किमान तासभर अडकून पडावे लागले. सातारा बस स्थानकामागील नवीन प्रशासकीय भवन मध्ये कौटुंबिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, सहकार निबंधक कार्यालय, जिल्हा वाहतूक पोलिस शाखा , ई -सेवा केंद्र, सातारा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, सातारा जिल्हा माहिती कार्यालय असे विविध शासकीय कार्यालय नेहमी गजबजलेले असतात.
आज पाऊस कोसळताच तळमजल्यावर पावसाच्या सरी व पाणी साचल्यामुळे ओलसरपणा फरशीवर जाणवत होता. त्यामुळे अनेकांना ये -जा करताना जपून पावले टाकावी लागत होते. तसेच येथील कंत्राटी महिला सफाई कामगारांनी तीन ते चार वेळा पावसाच्या पाण्याचा निचरा केला. तरीसुद्धा सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नवीन प्रशासन प्रशासकीय इमारतीमधील तळमजला ओलाचिंब झाला होता.
यामुळे कौटुंबिक न्यायालय व इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या अनेकांना तसेच या इमारतीमध्ये कामकाजासाठी आलेल्या लोकांना पावसाने उघडीप देईपर्यंत थांबावे लागले होते. या ठिकाणी काही कार्यालयात महत्वपूर्ण बैठक होती. या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील काही अधिकारी उपस्थित राहिले होते. त्यांना शासकीय वाहनापर्यंत जाण्यासाठी पावसात भिजावे लागले. परंतु, पाऊस हा आवश्यक असल्यामुळे त्याचाही अधिकाऱ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
सातारा येथील दमदार पावसामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर झालेली ओल (छाया- अजित जगताप- सातारा)