महाराष्ट्रराजकीय

माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-

ठाणे, दि. 25 – माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, मिलिंद भोंड, रविकांत पाटील, आनंद पाटील, बाजार समितीचे चेअरमन अशोक डक, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, माथाडी समाजाच्या व्यथा समजून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी माथाडी कामगार मेळाव्याचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर शासन गंभीरपणे विचार करीत आहे. माथाडी कामगार कायद्यातील तरतुदी बदलासंबंधीच्या मागणीवरून कामगार विभागाने सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र,त्यावेळी माथाडी नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्या सुधारणा थांबविल्या. बनावट माथाडींमुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना जेरबंद केल्यास आपल्या माथाडी कामगार बांधवांना दोन पैसे जास्तच मिळतील. त्यामुळे माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी काळानुरुप माथाडी कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. ते करताना या कायद्याचा आत्मा बदलणार नाही, असे आश्वासन देवून श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी कायद्याला बदनाम करणाऱ्या, त्याचा दुरुपयोग करणाऱ्या घटकांना जेरबंद करणार असून त्यासाठी या कायद्यात काळानुरूप काही बदल आवश्यक आहेत. मात्र सुधारणा करताना माथाडी नेत्यांच्या सूचनाही निश्चितच विचारात घेतल्या जातील.नाशिकच्या माथाडी कामगारांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निश्चितच लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. सिडकोच्या माध्यमातून माथाडी कामगार बांधवांसाठी घरांचा प्रश्नही येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. माथाडी कामगारांचे ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतले आहेत त्यांचे पैसे कायदेशीर मार्गाने परत मिळवून देऊ. बाजार समिती विकास आराखडा लवकरच पूर्ण करून यासंदर्भात बैठक लावून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
श्री.फडणवीस म्हणाले की, आमदार नरेंद्र पाटील यांनी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आतापर्यंत 70 हजार मराठा समाजातील नवउद्योजक तयार केले. या माध्यमातून तब्बल पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत या नवउद्योजकांना देण्यात आली. या उद्योजकांवर व्याजाचा बोजा पडू नये, यासाठी 560 कोटींचा व्याज परतावा महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आयएएस आयपीएस झाले, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या मदतीमुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जावू शकले, कौशल्य विकासाचे कामही जोमाने सुरू आहे. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा संघर्ष केला. हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. हे शासन मराठा समाजाचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्याच्या निमित्ताने संघटनेचे सरचिटणीस तथा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या मागण्या व समस्या मांडल्या. ते म्हणाले की, माथाडी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बनावट माथाडींवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. माथाडी कामगार कायद्यात सुधारणेचा प्रस्तावामुळे माथाडी कामगार अडचणीत आला आहे. बाजार समितीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सिडकोच्या माध्यमातून कार्यालयासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांना घरेही देण्यात यावीत.यावेळी माजी मंत्री व आमदार श्री.गणेश नाईक, श्री.शशिकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 18 कामगारांना “माथाडी भूषण” पुरस्काराने उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!