जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंडारवाडी धरण कृती समितीची आज करणार ठिय्या आंदोलन

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.२१. कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याविषयी काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर दि.२३ मार्च २०२२ रोजी आज शहिद भगतसिंग यांच्या स्मृतीदिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे मोठ्या संख्येने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा ५४गावातील जनतेने निर्णय घेतलेला आहे असे कृति समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी प्रतिपादन केले.

बोंडारवाडी धरण कृति समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी म्हणाले जावली तालुक्यातील ५४ गावांना वरदान ठरणारा शेती व शेतीपूरक व्यवसायातून वीस ते पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा नियोजित बोंडारवाडी धरण प्रकल्प गेली अनेक वर्षे आंदोलने होऊनी रखडला असून २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांना कण्हेर धरणाच्या सहा टक्के राखीव पाण्यातून बोंडारवाडी गावाजवळ शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे धरण बांधण्याच्या मागणीचा विचार करून पुढील कारवाईचे निर्देश दिले होते.
३ जानेवारीला जलसंपदा विभागाच्या अहवाला बाबत आवश्यक कागदपत्रांसह निवेदन दाखल केलेले होते. त्यानंतर आज २ महिन्यांचा कालावधी उलटूनही बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही.त्यामुळे या ५४ गावातील जनतेमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या समितीच्या माध्यमातून धरणासाठी अनेक आंदोलने केली बैठका घेतल्या मात्र अद्याप धरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही शेवटी भारत पाटणकर यांच्याकडे बोंडारवाडी धरणाचा निर्णय सोपविण्यात आला सध्या त्यांच्या माध्यमातून धरण होण्यासाठी समितीचा सरकार दरबारी संघर्ष सुरू आहे.
डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५४ गावची जनता २३ मार्च रोजी आज शहीद दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून आज जर शासनस्तरावरून काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर, शेतीसाठी पाणी मिळणे हा ५४ गावच्या जनतेचा हक्क असून तो मिळेपर्यंत ही जनता आपल्या कार्यालयावर ठिय्या देण्याचा या जनतेने निर्धार केला आहे. आपण या जनतेच्या मागणीप्रमाणे बोंडारवाडी धरणाबाबत शासनाकडे अहवाल पाठवावा असेही यावेळी मोकाशी यांनी प्रतिपादन केले.



