
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
केळघर.दि.२४.इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जावली तालुक्यातील महसूल प्रशासन यंञणा अलर्ट मोड असून तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या वेळेढेण परिसरात तहसिलदार हणमंत कोळेकर , नायब तहसिलदार प्रविण कोटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पायी चालत जाऊन दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या .
काल शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही तहसिलदार हणमंत कोळेकर , नायब तहसीलदार प्रविण कोटकर हे दोन्ही अधिकारी नव्याने हजर झाले असतानाही मंडलाधिकारी आर . जी . वंजारी, तलाठी एन . आर . मुलाणी आणि परिसराचा अनुभव असणारे तलाठी शंकर सावंत , सरपंच ठकूजी कोकरे यांना घेऊन ही टिम सकाळीच ठोसेघर पठारावर पोहचली . तेथून पाऊस, दाट धुक्यातून चालण्यास सुरुवात केली . घनदाट जंगलातील निसरडी वाट, वाटेत लागणारे दोन – तीन ओढे , जंगली श्वापदांची भीती यावर मात करत तीन – चार तासांचा पायी प्रवास करून ही टीम वेळेढेण गावात पोहचली .
यावेळी संततधार पाऊसात चिखल तुडवत जंगलातून जात असताना कांटे (जळू ) अधिकाऱ्यांच्या पायाला चिकटले , ते वेळीच अनुभवी लोकांनी काढले, याठिकाणी वीज नाही . मोबाईल रेंज नाही . अशा परिस्थिती तेथील वरची / खालची मायणी,वेळे,वेळेढेण या चार वाड्या – वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांची चर्चा करून,दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या . तेथील नागरिकांचे कायम स्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे .
यावेळी तेथे कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीत राहत असलेल्या लोकांची परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांचीही मने हेलावली.तर दाट धुके ,घनदाट जंगल , निसरड्या पायवाटा, वेगाने वाहणारे ओढे यातून वाट काढताना थरार अनुभव अधिकाऱ्यांनी पाहिला.
