सामाजिक
दिव्यांग कल्याण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
सातारा दि. 8.(जि.मा.का.) दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाच्या दारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण अभियानाची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगांचे सर्वेक्षण व तपासणीसाठी दोन पथके तयार करण्यात यावीत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, एक पथक मुख्यालयी व एक पथक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर फिरत्या पद्धतीने तैनात करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्व दिव्यांगांचे सर्वेक्षण व तपासणी पूर्ण केल्यानंतरच हे पथक पुढील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात यावे, अशा पद्धतीने सर्व तालुक्यांसाठी नियोजन करावे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वय ठेवावा.
ग्रामीण भागातील काम पूर्ण झाल्यानंतर नगर पालिका क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम सुरु करावे.
ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्वात जास्त दिव्यांग आहेत तेथून या शिबीराची सुरुवात करावी. दिव्यांगांची माहिती पाच दिवस आधी भरुन घ्यावी. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी ग्रामसेवकांकडे द्यावी यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी दिल्या.
000