स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
सातारा दि.२१. चांगल्या दर्जाची साधनसामग्री आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत पोलीस दलही गतिमान सेवा देऊ शकत नाही. यासाठी वित्त व गृह या दोन्ही खात्यांचा राज्यमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील तीन टक्के रक्कम पोलीस दलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचा विकास आराखडा सुमारे 400 कोटींचा असून यामधून पोलीस दलाला यावर्षी 12 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा नियोजन व विकास समिती यांच्याकडून जिल्हा पोलीस दलासाठी साधनसामुग्री व वाहने हस्तांतरण, जिल्हाधिकारी कार्यालय येथील पोलीस चौकीचे उद्घाटन, ग्राम सुरक्षा यंत्रणा शुभारंभ असे कार्यक्रम पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक गृह के. एन पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, उद्योजक फारुक कूपर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासन पोलीस दल अद्ययावत करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करुन देत आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदलत असून 112 या क्रमांकाला प्रतिसाद कालावधी 7 ते 8 मिनीटांवर आला आहे. पोलीस दल अत्यंत कार्यक्षम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना समाजात कोणतीही तेढ निर्माण न होऊ देता जिल्हा पोलीस दलाने कौशल्याने स्थिती हाताळली. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना जिल्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय चांगली आहे, असे कौतुक करुन त्यांनी ग्राम सुरक्षा दल उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या.
ठाणे जिलह्यामध्ये प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाहन उपलब्ध करुन दिले आहेत. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रांत आणि तहसीलदारांना वाहने उपलब्ध करुन देवू त्या बदल्यात यंत्रणेनेही जनतेला अत्यंत गतीमान तत्पर सेवा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन केले.
आमदार महेश शिंदे यांनी पोलीस दल आधुनिकरणासाठी साधन सामुग्री हस्तांतरीत होत असल्याबद्दल अभिनंदन करुन ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या उपक्रमामुळे चोरी, दरोडे यासारख्या घटनांना आळा बसेल. सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे गृह राज्यमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र लेखा शिर्ष निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पोलीस यंत्रणा अहोरात्र कष्ट करत असून समाजात शांतता प्रस्थापित करीत आहेत याबद्दल पोलीस दलाचेही कौतुक केले.
उद्योजक श्री. कूपर त्यांनी मनोगत व्यक्त करतांना पोलीस त्यांचे कर्तव्य निष्ठेने बजावत असल्याने आपले गाव, आपला समाज सुरक्षित व शांत आहे. त्यांच्या कार्याला मदत करत असताना आनंद होत असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी पोलीस दल आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी व उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटीहून अधिक निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. याद्वारे जनतेला जलद व प्रगत सेवा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती निधीमधून जिल्हा पोलीस दल आधुनिकीकरणासाठी 95 लाख 20 हजार किंमतीचे 8 ड्रोन कॅमेरे, जिल्हयातील एकुण 32 पोलीस ठाणे, 7 उपविभागीय कार्यालये आणि 11 शाखांचे अत्याधुनिकीकरणासाठी 50 संगणक संच, 50 प्रिंटर आणि 50 युपीएस, रुपये 33 लाख 27 हजार किंमतीचे खरेदी करण्यात आले आहेत.
6 लाख 56 हजार किंमतीची सीडीआर ॲनिलीसीस प्रणाली, 1 कोटी 36 लाख किंमतीचे 40 जनरेटर सेट, 11 लाख 68 हजार किंमतीची 15 दुचाकी वाहने, 1 कोटी 22 लाख 97 हजार किमतीचे 6 वातानुकुलीत मिनी बस खरेदी करण्यात आले आहेत.