सातारासामाजिक

काटवली- ठाणे एसटी ही चांगले उत्पन्न देणारी बस बंद केल्याने प्रवासी संतप्त

स्टार ११ महाराष्ट्र —-

गाडी तातडीने पूर्ववत व कायमस्वरूपी सुरू न केल्यास आंदोलन करणार

पांचगणी : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली काटवली- ठाणे एसटी ही चांगले उत्पन्न देणारी बस कालपासून अचानक बंद केल्याने या परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ही बस सेवा तात्काळ कायमस्वरूपी पूर्ववत सुरू करावी अन्यथा आम्ही कुडाळ, पाचवड, करहर , काटवली परिसरातील नागरिक मेढा आगरसमोर ठिय्या आंदोलन करून एकही बस बाहेर सोडणार नाहीत. असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

जावळी तालुक्याच्या डोंगर कपारीतील दुर्गम भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना लगतच्या शहरांशी सहज पोहोचता यावे यासाठी मेढा आगाराची निर्मिती झाली परंतु या डेपोच्या आगारप्रमुखाना तालुक्यातील जनतेच्या सेवेपेक्षा पर तालुक्यातील प्रवाशांचा पुळका येऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सेवा देण्यापेक्षा सोलापूर, लातूर, तुळजापूर, पंढरपूर, पुणे या गाड्या बिनधास्तपणे सुरू आहेत. पण तालुक्यातील जनतेला मात्र यामध्ये आगारप्रमुख वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे.

जावळी तालुक्याचा कुडाळ आणि मेढा विभाग असे येतात. यातील कुडाळ विभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना या विभागात मात्र मोजक्या पांचगणी – पाचवड अशा दोन, तीन फेऱ्या चालू आहेत. त्या सुद्धा गाड्या बंद पडणे, अचानक कॅन्सल करणे यामुळे येथील प्रवाशी अक्षरशः वैतागले आहेत. त्यामुळे या विभागातील नागरिकांनी आगार प्रमुखांना थेट गाड्या नसल्याने धारेवर धरत काटवली – ठाणे मुंबई ही गाडी सुरू केली. ही गाडी रोज पूर्ण भरून मुबई पर्यंत जात असून पुनः माघारी येताना सुद्धा भरून येत आहे. असे असताना परवानगी व ओव्हर टाइम चार्ज वाढत असल्याचे कारण पुढे करून ती गाडी अचानक बंद केल्याने या परिसरातील प्रवासी व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

काटवली – ठाणे मुंबई ही बस स्थानिक नागरिक व मुंबईकर युवकांच्या प्रयत्नाने अक्षरशः मोठे उत्पन्न देवून चालू ठेवण्यात यश मिळवले असताना. काहीही कारण पुढे करून अचानक बस बंद केल्याने नागरिक नाराज झाले आहेत. मुंबईला जाताना पाचवडला जाऊन गाडी पकडण्यासाठी होणारी धावपळ जीवघेणी असून खाजगी बसपेक्षा हा एस टी ची सेवा आपुलकीची होती. त्यामुळे अथक परिश्रम घेवून चालू झालेली गाडी बंद झाल्याने नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

मेढा आगार प्रमुखांनी ही गाडी पूर्ववत तातडीने सुरू न केल्यास मेढा आगारात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.


नव्याने सुरू असणारी ही काटवली – ठाणे बस आगार प्रमुख यांनी तातडीने पूर्ववत आणि कायमची सुरू करावी. त्याच्या लागणाऱ्या परवानग्या संबंधित आगार प्रमुखांनी घ्याव्यात. ही बस तातडीने सुरू न केल्यास आम्ही आगाराच्या दारात बसून ठिय्या आंदोलन करणार आहोत. एकही गाडी आवारातून सोडून देणारं नाही.

संदीप पवार

उपजिल्हाप्रमुख शिवसेना

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!