
सातारा प्रतिनिधी (अजित जगताप)
मेढा दि ३०. सुमारे साडेआठ हजार लोक वस्ती राहत असलेल्या मेढा नगरीमध्ये सध्या समस्यांचे आगार बनले आहे. मंत्री महोदय व नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रामाणिकपणाने विकास कामे आणतात पण, पक्ष बदलू कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे मेढा नगरी चांगलीच चर्चेत येऊ लागलेली आहे.

याबाबत माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्याने इतिहास घडवला, पराक्रम केला.लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष हाच राजकीय पक्ष मानणारे कार्यकर्ते निर्माण झाले. त्यामुळे सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी नेत्यांव्यतिरिक्त कोणीही वाली नाही. हे विदारक चित्र समोर येत आहे. मुळातच सातारा- महाबळेश्वर रस्त्यावरील मेढा नगरी निसर्ग संपन्न आहे. दळणवळणाची साधने आहेत. पर्यटन विभागाने या ठिकाणी विसावा म्हणून पाहिल्यास खऱ्या अर्थाने पर्यटकांना चांगला विसावा मिळू शकतो.अनेक समस्याने पर्यटक सुद्धा पाठ फिरवत आहे.
मेढा शेजारी वेण्णा नदी असूनही मेढा नगरीतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. काही जण स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी सेकंड हॅन्ड चार चाकी घेतात. पार्किंगला जागा नसल्यामुळे रस्त्यावरच पार्किंग करून निघून जातात. तुमची गाडी पार्किंग तर आमचा दुकानातील माल गटारावर अशी युती दिसून येत आहे.
याबाबत कधीही प्रशासन व पोलीस यंत्रणेने सुद्धा कर्तव्यदक्षतेने पाहिले नाही. एक मुखी मेढा…. त्याला चारी बाजूने समस्यांचा वेढा… असंच म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील दुभाजक व विद्युत खांब यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. बंदिस्त गटार काही ठिकाणी झाले आहे तर काही जागेमध्ये व्यक्तिगत हेवेदावे व वाद उफाळून आलेला आहे. त्याचा फटका करदात्या नागरिकांना बसला आहे.
जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीत नोकरी – व्यवसाय निमित्त अनेक जण स्थायिक झालेले आहेत. या ठिकाणी सार्वजनिक बाग, मॉर्निंग वॉक साठी ट्रॅक नाही. खेळाचे मैदान नाही .सुसज्ज बस स्थानक आहे परंतु अतिक्रमणाच्या विळख्यांमध्ये ते दडून गेले आहे.
जावळी तालुक्यात पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. आता सब कुछ भाजप असूनही पक्षासाठी त्याचा उपयोग होत नाही. ही खंत आता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. मग अशा कार्यकर्त्यांचा पक्षासाठी उपयोग होत नसेल तर त्यांना पदे आणि सन्मान कशाला द्यायचा? असही सूर उमटू लागलेला आहे.
वास्तविक पाहता मेढा नगरीला पर्यटन केंद्र बनवण्यासाठी खूप मोठा वाव आहे. परंतु, दूरदृष्टी असलेले नेते असून सुद्धा कार्यकर्त्यांची मरगळ हीच त्याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जे कोणी चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बुद्धिमत्ता व अनुभवाचा विचार करून मेढा नगरी सुसज्ज करण्यासाठी आतापासूनच पाऊल उचलले काळाची गरज बनली आहे. आद्यता सत्ताधारी पक्ष हाच आमचा राजकीय पक्ष हे रहाट सुरूच राहणार आहे.