Uncategorizedधार्मिकमहाराष्ट्रसातारासामाजिक

जिवनाच्या खडतर प्रवासातून श्रीमती पार्वतीआईंचा ८० व्या वर्षात पदार्पण

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —-

चंद्रभागेच्या घरी…
जाणीव कष्टाची.!
🔸🔹🔸🔹🔸🔹

श्रीमती पार्वतीआई जवळ


आयुष्यात कोणाच्या घरात, कोठे जन्माला यावे हे आपल्या हातात नाही,पण ज्या घरात जन्म मिळेल त्या घरात आपल्या संस्काराने आणि स्वकर्तृत्वाने शेवटचा दिवस गोड होई पर्यंत कार्यरत रहावं.त्यातच स्री जन्म असेल तरं एक नव्हे तर दोन घरे,संसार घडविण्याचे भाग्य लाभत असते. पण… नवरा व्यसनी असेल तर?कर्तृत्वशुन्य असेल तर?चार मुलांसह संसार सांभाळावा कसा?अशा सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील का? हो अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आयुष्य जगणारी,अनेक महिलांना आदर्श देणारी जावळी तालुक्यातील कणखर,खंबीर वाघिण म्हणजेच श्रीमती पार्वतीआई जवळ.रिटकवली गावच्या माता भिमाई व पिताश्री लक्ष्मण यांच्या उदरी जन्म घेतलेली चंद्रभागा
खरं तरं हे कुटुंब धार्मिकच, म्हणून तर माता भिमाई यांनी मुलींची नावे अनुक्रमे इंद्रायणी,नर्मदा आणि चंद्रभागा अशी पवित्र नद्यांची नावे ठेवली असावी.
यातील चंद्रभागा यांचा विवाह जवळवाडी येथिल कृष्णा नारू जवळ यांचे चिरंजीव शंकरराव यांच्याशी झाला.
लग्नानंतर चंद्रभागा नाव बदलले आणि पतीच्या आवडीचे शंकराची पार्वती असे नाव झाले. अवघ्या काही वर्षांचा सुखाचा संसार, शंकररावांच्या वाढत्या व्यसनाधिनतेमुळे संसाराचा गाडा पुरता कोलमडला. तो काळ वेगळा होता.घटस्फोट, नवरा सोडणे अशा प्रथा नव्हत्याच. बापाच्या नावासाठी इज्जतीत जगण्याचा काळ होता.


अशा परस्थितीत वर्षा मागून वर्षे गेली त्यातच अनुक्रमे दोन मुली, दोन मुलगे घरात जन्माला आले. जगाबाई, संजना,सुभाष आणि विलास अशीही लेकरं.!
१९७८ साली इयत्ता दुसरीत असतानाच कावीळच्या आजारात सुभाष दगावला.तीन मुलं आणि व्यसनाधिन पती यांच्यासाठी पार्वतीआई अनेक कष्टाची कामे करायच्या.पहाटे ५ वा.उठून रात्री ११ वाजेपर्यंत न थकता न दमता कष्टत रहायच्या. अल्पशी शेती होती त्यामधे पावसाळ्याला राबायच्या आणि दोन जनावरे दुधासाठी सांभाळायच्या.उन्हाळ्याला मात्र इमारतींवरती ६ रूपये हजरीने बिगारी म्हणून, पाझर तलाव येथे रोजगार हमीवर काम करायच्या असे अनेक वर्षे सुरु होते.
पार्वतीआईंचे बंधू बाळकृष्ण शेठ दुंदळे यांनीच दोन मुलींची लग्न केली.पण यादरम्यान पती शंकरराव यांचे मात्र दारूचे व्यसन अधिक वाढतच गेले.घरातील पितळेची,तांब्यांची भांडी विकावी, त्यातून येणार्‍या पैशातून दारू प्यावी.लोकांची काहीही कामे करावी, मिळेल त्या पैशाची दारू प्यायची व उरलेल्या पैशातून मटका लावावा हे नित्याचेच झाले. शंकरराव रात्री ओरडत गावात आले की, अर्धा गाव त्यांच्या घरी भांडणे बघायला गोळा व्हायचा.घरात आले की जेवण फेकून देणे, शिविगाळ करणे आणि मारझोड करणे हे रोजचे झाले होते.


या नित्याच्या त्रासाला कंटाळून १९८५ साली पार्वतीआई यांनी रात्री विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पण वेळेत योग्य उपचार मिळाल्याने त्या बचावल्या.पण व्यसनाधिनता वाढत गेल्याने १९९० साली शंकराराव यांचा दारूच्या नशेत रस्त्यावर पडून दुर्देवी अंत झाला.आता विलास या एकाच मुलाची जबाबदारी होती. त्याला शिकवावं, वाढवावं, घडवावं ही त्यांची इच्छा होती.परस्थितीमुळे त्या विलास याला जास्त शिकवू शकल्या नाहीत. पण घडविण्यात मात्र कोठेही कमी पडल्या नाहीत.


तुप-रोटी नसेल दिली या माऊलीने,पण प्रेमाची चटणी-भाकर मात्र कधीच कमी पडू दिली नाही. सोसायटीत मिळणार्‍या २५ रूपयांच्या व टाचलेल्या लूगड्यांवर दिवस काढले पण लेकरांच्या अंगाला मात्र वस्त्र कमी पडू नाही दिले तीने. लेकराला चप्पल,बुट देण्यासाठी,स्वतः मात्र अनवाणी चालताना अनेक काटे तुडविले तिने.मुलांची भूक भागविण्यासाठी वेळेला स्वतःच्या पोटाला मात्र चिमटा काढला तीने.अनेक इमारती घडविताना, विट-वाळूची, मातीची घमेली उन्हातान्हात वाहताना, घामाने भिजली जरी,मुलांना मात्र पदराच्या सावलीत वाढविले.

अशा या पार्वतीआईंच्या संस्काराची शिदोरी एवढी मोठी आहे,ज्या दारूने तीच्या तारूण्याची,आयुष्याची आणि संसाराची धुळधाणं केली,कपाळावरचं कुंकु हिरावलं, त्याचं दारूला जावळी तालुक्यातून हद्दपार करण्याचे बळं सुपुत्र विलासबाबा जवळ यांना मिळाले.
पहिले असे होते, झाडं लावायची आजीने, फळे खायची नातवांनी.पण पार्वती आईने घराभोवताली लावलेल्या झाडांची फळे वयाच्या ८० व्या वर्षीही परतूंडांसोबत आनंदाने खातायत हेचं त्यांच्या केलेल्या कष्टाचं सुवर्ण फळ आहे.पार्वतीआई आजही थरथरत्या हातांसह शेतात राबत असतात.त्यांच्या जिद्दीला,कर्तृत्वाला, श्रमाला त्रिवार सलाम आणि त्यांच्या निरोगी व शतायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.


आज पार्वतीआईंचे कुटुंब केवळ माळकरी,वारकरीचं नसून गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाची प्रेरणा व समाजसेवेचा वसा घेवून समाजासाठी सातत्याने कार्य करीत आहेत.
परस्थिती वाईट असताना अनेक जण हसले,मदत मागूनही वेळेला मिळाली नाही.पण आज अशा अनेक अभागी महिलांना याच कुटुंबातून मदत होते.याच्यापेक्षा आनंद काय असू शकतो.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!