ट्रेकिंगसाठी आणि पर्यटनांसाठी प्रसिध्द असलेला वासोटा किल्ला तीन दिवस राहणार बंद


सातारा.दि.२६.सातारा जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी आणि पर्यटनांसाठी प्रसिध्द असलेला आणि सर्वांचे आकर्षण असणारा वासोटा किल्ला पुढील ३०डिसेंबर पासून १ जानेवारी २०२३ पर्यंत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.

नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी मोठ्या प्रमाणात करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. निसर्ग व वन्य जीवांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीसुध्दा तीन दिवस वासोटा किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलागकडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची प्रचंड गर्दी होत असते. यामुळे वनक्षेत्रास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनसंरक्षणाच्या दृष्टीने येत्या दि. 30, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागाचा वतीने सांगण्यात आले आहे.



