स्टार ११ महाराष्ट्र न्युज —
सातारा.दि.१२. सातारा शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सातारा शहरासह हद्दवाढ भागातील विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठीही कोट्यवधींचा निधी मिळवला. माझं काम सरळमार्गी असते. कोणी काहीही बोललं तरी माझे काम काही थांबणार नाही. विकासकामे कोण करतंय हे सातारकर चांगलेच जाणतात. त्यामुळे नारळफोड्या गँगच्या बडबडीला आपण महत्व देत नाही, असा टोला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.

सातारा शहरातील कुंभारवाडा ते समर्थ मंदिर आणि समर्थ मंदिर ते बोगदा या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अशोक मोने, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, जयवंत भोसले, भालचंद्र निकम, धनंजय जांभळे, सौ. अंजली कुलकर्णी, अशोक गोडबोले सचिन देशमुख, शहाजीराव माने, रविंद्र खरात, निलूताई पवार, आशिष निकम, संतोष घोरपडे, फिरोज पठाण यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरीक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारकरांनी मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता विरोधकांच्या हाती दिली पण, सत्ताधाऱ्यांनी पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून सातारकरांचा विश्वास धुळीस मिळवला. नगर पालिकेत झालेला भ्रष्टाचार सातारकर उघड्या डोळ्यांनी पाहत होते. सत्ता नसतानाही राज्य शासनाकडून सातारा शहर आणि हद्दवाढ भागासाठी कोट्यवधीचा निधी आपण मिळवला. सत्ता असो वा नसो, सातारा शहराचा विकास करणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यात मी कधीही कमी पडलो नाही. सातारकरांचा विश्वासघात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा घडा आता भरला आहे. आता सातारकर त्यांना चांगलाच धडा शिकवतील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.



