स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ———
मेढा.दि .१२. आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी ” जागतीक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांचे” लोकसंख्या दिन व लिंग समानता ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी व उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.आनंद साठे म्हणाले “लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक आहे.लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या वाढतात. बेकारी हा त्याचाच परिपाक आहे.आपल्या देशात स्त्री – पुरुष विषमता आहेच,याशिवाय केरळ हे राज्य वगळता स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाणही इतर राज्यात भिन्न आहे.ही लिंग समानता नसल्याने अनेक समस्या येत आहेत. या मानवी समस्यांचे निवारण करण्यासाठी व स्त्री – पुरुष समता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत.गर्भलींग निदान बंदी कायदा करून या प्रकारास आळा बसवला जात आहे.तसेच देशातील बेरोजगारी व लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी प्रयत्न माता आरोग्य व कुटुंब नियोजन याबाबत जनजागृती करणे व मानवाचे हक्क आबादित राखणे हे आपले कर्तव्य आहे ” असे मत व्यक्त केले.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जागतीक व देशातील लोकसंख्येचा विस्फ़ोट व त्यावरील उपाययोजना याविषयीं आपली मते व्यक्त केली.उपप्रचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद घाटगे यांनी प्रास्ताविक केले व या कार्यक्रमाची भूमिका विषद केली.प्रा. डॉ.संजय धोंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विध्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.शेवटी प्रा.डॉ.सुजित कसबे यांनी आभार मानले.